Wednesday 15 November 2017

उन्हाचे घुमट खांद्यावर


     अनुजा जोशी यांचा ‘उन्हाचे घुमट खांद्यावर’ हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. ‘उत्सव’ या संग्रहानंतरचा हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह. ‘लोकवाङमय गृहा’सारख्या प्रतिष्ठित प्रकाशनानं हा कवितासंग्रह प्रकाशित केलेला असून राजन गवस यांनी मलपृष्ठावर संग्रहातील मर्मस्थानांचा थोडक्यात निर्देश केलेला आहे. मुखपृष्ठ आणि संग्रहाची निर्मिती आतल्या कवितांना साजेशी आहे. या कविता वाचताना प्रकर्शानं जाणवतं की अनुजाचं हे दुसरं पाऊल बरंच पुढं पडलंय.

अनुजा कविता लिहायला लागली तीच मुळी स्वतःच्या शैलीत. सजग राहून, जाणकारांचं मार्गदर्शन घेत ती घडत राहिली. कशी, किती ते तिच्या ‘खांद्यावरचे उन्हाचे घुमट’ सांगतात. प्रचंड आवेग ओसंडत असतो तिच्या कवितांमधून. तरी आत-बाहेरच्या संघर्षांचे अनुभव शब्दांकित करताना तिची कविता वैयक्तिकतेच्या परिघात अडकत नाही. त्या अनुभवांमधलं मर्म शोषून संपृक्त झालेल्या प्रतिमा तिच्या कवितांमधे सहज वावरतात. ती अवलोकन करते भोवतालाचं, पिऊन घेते निसर्गसान्निध्य आणि त्यात समरसून आतले उमाळे पेरत जाते प्रतिमांमधे... खास अनुजा-स्पर्श असलेल्या या प्रतिमा हे या संग्रहातल्या कवितांचं बलस्थान आहे.

या संग्रहातल्या कवितांमधे येणारी ‘चित्र काढणारा मुलगा’, ‘एकमेकांवर कुरघोडी करणारी मुलं’, ‘स्पेशल’ मुलगा, ‘शाळेत जाणार्‍या मुली’, ‘पेशंट बाया..., ‘आयो’ ही केवळ शब्दचित्र नाहीत ती उत्कट भावचित्रही आहेत. गोव्यातली देशीयता हा या संग्रहातील कवितांचा अलंकारच झालाय... उदा. ‘चळवळ’ या कवितेतल्या या ओळी-  ‘आता रुजेल टायकिळा जळीमळी / रुजेल तेरडा निर्भय /... आणि रानभर सुरू होईल आता / एक हिरवीक्रांत चळवळ...! परराज्यात राहून तिथल्या निसर्गाशी, लोकसंस्कृतीशी इतकं तादात्म्य पावून स्वतःला, आपल्या कवितेला आणि पर्यायानं मराठी भाषेला समृद्ध करणं हे कौतुकास्पद आहे.

या अर्थपूर्ण निसर्गप्रतिमा आणि आत्मकेंद्रीपणाचं बोट सोडलेले अनुभव यामुळं वाचकाला खिळवून ठेवणार्‍या कवितांमधल्या काही ओळी- ‘पिऊन घे हा आयुष्याचा नीरस..’ (६३), ‘अख्खा कोलाहल चौकोनी सावलीच्या बाहेर ठेवून..’ (६१), ‘अर्धी खिडकी उघडी म्हणजे उजेड अर्धा’ (६६), ‘हा तुडुंब अंधार अर्थपूर्ण’ (९२), ‘इतके पेलले आहेत उन्हाचे घुमट खांद्यावर.. तसं आणखी थोडं..’ (९८).. अशी आणखी कितीतरी उदाहरणं देता येतील...

खोलवर हलवून टाकणारी ‘तिळा तिळा दार उघड म्हणून ठोठावतंय कुणीतरी’ (४०) ही कविता पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहे. दार ठोठावणारं कोण असेल? एक तीळ वाटून घेणारे ते सात, ते पाच की शंभर, की परवलीचा शब्द माहीत असलेला अलिबाबा.. की ते चाळीस?... असा विचार करणारी कवितेतली मी म्हणतेय, ‘तूर्तास मी लावली आहे गच्च / भव्य दिसणारी कर्तव्यकठोर शिळा / अवघ्या भयाच्या तोंडावर...’

अशा अनेक अस्सल कविता असलेला हा कवितासंग्रह एकदा वाचून ठेवून देता येत नाही.. तो वाचताना कवयित्री समोर असल्यासारखी वाटते. पण ती मधे बोलून व्यत्यय आणत नाही. निवांत ऐकू देते शब्दांमधली गाणी-गार्‍हाणी..!

या दर्जेदार कवितासंग्रहाचा इंग्रजी अनुवाद करून पूर्ण झाला आहे. बरीच वर्षे अमेरिकेत वास्तव्य असलेल्या वर्षा हळबे यांनी तो केलेला आहे. लवकरच तो प्रकाशित व्हावा आणि या निमित्तानं आजची मराठी कविता मराठीचा परीघ ओलांडून अनेक वाचकांपर्यंत पोचावी ही सदीच्छा.

आसावरी काकडे
१४.११.२०१७

‘उन्हाचे घुमट खांद्यावर’ कवितासंग्रह
अनुजा जोशी
लोकवाङ्मय गृह प्रकाशन
पृष्ठे १०४, किंमत- १६० रु.
सकाळ, सप्तरंग पुरवणी- २६ ११ २०१७

No comments:

Post a Comment