Friday 3 November 2017

रक्तचंदन : दंश करणारी प्रतिमा

आश्लेषा महाजन यांचा ‘रक्तचंदन’ हा नवा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. आश्लेषा पुण्यातली प्रस्थापित कवयित्री. तिची साहित्यिक वाटचाल अगदी नेटकेपणानं चालू आहे. तिचा अभ्यास, व्यासंग आणि शब्दप्रभुत्व तिच्या लेखनातून, ती करत असलेल्या कार्यक्रमांतून जाणवतं. सतत लिहितं राहिल्यामुळं तिच्या अभिव्यक्तित सफाई आणि विचारात स्पष्टता आलेली आहे.

‘रक्तचंदन’ हा आश्लेषाचा ताजा कवितासंग्रह हातात पडताच वाचायला घेतला. हा संग्रह ‘पुनर्नवा होणार्‍या स्त्री चैतन्यास’ अर्पण करण्यातली आश्लेषाची संवेदनशीलता लक्ष वेधून घेणारी वाटली. बाईला पुरुषांपासून वेगळं करणारं, तिला पुनर्नवा करणारं हे स्त्री-चैतन्य ज्यामुळे बाईला प्राप्त होतं ते निखळ शारीर वास्तव या कवितासंग्रहातील ‘रक्तचंदन’(पृ.४०), ‘तीन प्रवाह’(पृ.४२) या कवितांमधून स्पष्ट, तरी घरंदाज भाषेत चित्रित झालेलं आहे. मासिक पाळी हा सहसा उच्चारला न जाणारा पण बाईच्या पूर्ण जगण्याला व्यापून राहिलेला विषय या कवितांमध्ये आश्लेषानं सूक्ष्म बारकाव्यांसह मांडलेला आहे. त्यात मासिक पाळीच्या अनुषंगानं बाईच्या आयुष्यात होणारे मानसिक, शारीरिक बदल आणि त्यामुळे भोवती उमटणार्‍या सामाजिक प्रतिक्रिया हे सारं उत्कटतेनं आलेलं आहे.

या संग्रहातील बर्‍याच कविता वेगवेगळ्या पातळीवरून बाईपणाचा वेध घेणार्‍या आहेत. ‘सुपरवुमन..’ ही कविता, बाईला सरस ठरायचंय ते नेमकं कुणापेक्षा? असा प्रश्न विचारत स्वतःत खोल उतरून आत्मपरिक्षण करते. ‘किती लवकर’ या कवितेत अल्लड बालिका ते आई/बाई अशा बाईपणाच्या प्रवासाचं वर्णन केलंय आणि शेवटी म्हटलंय, ‘किती थोड्या त्यातल्या माणूस होतात बाया... पुसू पाहतात सटवाईच्या रेषा.’ वेगवेगळ्या संदर्भातला असा ‘प्रवास’ चित्रित करणं हे आश्लेषाच्या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. ‘प्रश्नांच्या तळ्यात मळ्यात’ या कवितेत तर ती ‘तहान होऊन’ उत्खनन करत बाईपणाच्या भूत-भविष्याचा पटच उलगडू पाहाते... पूर्वजा नि वंशजांना एका मंचावर उभं करते. ही कविता काहिशी गद्य वाटली तरी पूर्ण वाचल्यावर शेवटी ‘वा..!’ अशी दाद दिल्याशिवाय राहावत नाही.

बाईपणाच्या या कविता बारकाईनं वाचल्यावर ‘रक्तचंदन’ ही शीर्षक-प्रतिमा उमगत जाते... मनाला खोलवर दंश करते..! त्यानंतर पुस्तक मिटून संग्रहाच्या मुखपृष्ठावरची रक्तचंदनाची रेखिव बाहुली नीट पाहिली की या प्रतिमेचे अनेक पदर मनात उलगडत जातात.. शारीर-वेदनेवर उगाळून लावल्यावर मनाचं शांतवन करणार्‍या लाकडाला बाईच्या आकाराची बाहुली बनवून औषध म्हणून विक्रीसाठी ठेवलं जातं...! स्वतः झिजून शारीर वेदनेवर लेप बनून राहायचं आणि वेदना शमवून नाहीसं व्हायचं... रक्तचंदनाच्या या गुणधर्माला बाईच्या रूपात प्रथम पेश करणार्‍याला बाईचे हे गुणधर्म जाणवले असतील की फक्त आकर्षक रूप? माहीत नाही. पण यातून- बाईला बाहुली करता येणं, तिच्या आकर्षकतेचा वापर होणं, विक्रीला ठेवता येणं, गरजेपुरतं वापरून बाजूला ठेवून देणं, तिच्यात ‘हे गुणधर्म’ असतातच हे गृहीत धरणं....अशा समाजमनात रुजलेल्या बर्‍याच गृहीत गोष्टी व्यक्त होतात..! कवितासंग्रहाचं ‘रक्तचंदन’ हे शीर्षक आणि मुखपृष्ठावर, आत जागोजागी दिसणारी रक्तचंदनाची बाहुली यातून इतकं सगळं सूचित होतं.. पण त्यासाठी आतील कविता मनात मुरवून घेत वाचायला हव्यात..!

असं असलं तरी या संग्रहातील कविता फक्त बाईपणाभोवती फिरत नाहीत. यातल्या बाईचं मन माणूसपणानं समाजाकडं पाहातं आहे. उदाहरण म्हणून ‘शनैः शनैः’(पृ.७९), ‘संस्कृतीच्या गोपुरामध्ये’(पृ.१००), ‘हौसाबाई आणि बदल’(पृ.१०२), अशा काही कवितांचा उल्लेख करता येईल. ‘शनैः शनैः’ या कवितेत म्हटलं आहे, ‘गर्भातून जिच्या जन्म घेई काळ । त्याचाच विटाळ वाटे कैसा..?/ आंधळ्या दिशेने चालला प्रवास । भोवंडतो आस कक्षेचा हा../ मूढतेचे खूळ विज्ञानाला तडे । आवळते कडे शनैः शनैः..’

भोवतीच्या वास्तवाकडं सजगतेनं पाहणारं हे बाईमन स्व-रूपावरही लक्ष ठेवून आहे. या अंतर्मुख मनाला प्रश्न पडतात, ‘कोण मी? आले कुठे? हे प्रश्न मज लावी पिसे / मूळ उगमाच्या दिशेने धावते मन हे असे..’ (‘ईश्वरा, ह्या जीवनाचे...’ पृष्ठ ११३). रोजच्या जगण्याच्या धावपळीतही या संवेदनशील मनाला वाटतं, ‘बाई जगणे जगणे / जणू धावणे धावणे / भुईवर पाय आणि / आभाळाला ओलांडणे.... / एक दिन असा यावा / ‘इथे’,‘तिथे’ व्हावे लुप्त / पूल निखळावा, व्हावे / सारे एकसंध, तृप्त...!’ (‘बाई जगणे...’ पृष्ठ १९).

अंतर्मुख विचार देणार्‍या अशा कवितांमध्ये ‘मी पुन्हःपुन्हा जन्म देते- भयाला!’ अशी सुरुवात असलेली ‘जीवंतिका’ (पृष्ठ ७३) ही पूर्ण कविता पुन्हा पुन्हा वाचून मनन करावी अशी आहे. याशिवाय ‘हे घर मला पुरत नाही’(पृ.९४), ‘अल्झायमर’ (पृ.५७), ‘फट’ (पृ.१६), ‘जन्म झाला आहे जुना’ (पृ.११४), या कावितांमधूनही हे आत्मनिरीक्षण व्यक्त झालं आहे. काही ठिकाणी हे आत्मचिंतन तत्त्वज्ञानाच्या पातळीवर गेलेलं आहे.

कवितेचं माध्यम असलेली भाषा, शब्द हेही कविता-विषय झाल्याचं काही कवितांमधून जाणवतं. उदा. ‘सोपं नाही’ (पृ.१४) या कवितेत शेवटी म्हटलं आहे, ‘खरंच! अवघडच आहे / स्वतःला अनावृत.. पारदर्शी.. आरपार पाहणं / स्वतःला भेदत, छेदत, वेधत राहणं / स्वतःला स्वतःपासून वेगळं करत तपासत राहणं.. वगैरे / खरंच! अवघडच आहे / असं दुभंगलेलं व्यक्तिमत्व पांघरून / देहातलं विदेहीपण बेमालूम झाकून / पुन्हा ते प्रतिभेतून.. कवितेतून.. शब्दांतून मांडणं... वगैरे’

‘जगाला कळतच नाही’ (पृ.४९) या कवितेत व्यवहारी जगात जगताना आतल्या हाकांकडे दुर्लक्ष करावं लागण्यातली संवेदनशील कविमनाची जीवघेणी तगमग फार आर्ततेनं व्यक्त झालीय. कवितेत शेवटी म्हटलंय, ‘इकडे, क्षणाक्षणाला नवनवे बीज / उमलतच राहते मनाच्या खोल गर्भात.../ आणि जगताना कळत सुद्धा नाहीत- मी स्वेच्छेने, सोय म्हणून, अथवा / परिस्थितीशरण होत केलेल्या / माझ्याच संवेदनांच्या गुप्त भ्रूणहत्या.. / खरंच जगाला कळतच नाही..! कवितेविषयक कवितांमधली ‘केयॉस’ (पृ.८८) ही कविता वेगळा विचार देणारी आहे. सगळं ठीक चाललेलं असताना कविमनाला ‘सौंदर्याऐवजी विस्कटलेला विरूप केयॉस भोगायला हवा..’ असं वाटतं आहे.

कवितेतील छंदांवर आश्लेषाची चांगली पकड आहे. शब्दांना फक्त अर्थ नाही एक नादही असतो. छंदांमुळे कवितेतील शब्दांचा नाद सक्रीय होतो. त्यामुळे कवितेचा आशय सुंदरही होतो. स्वैर मुक्तछंदाच्या आजच्या काळात छंदोबद्धता काहिशी दुर्मिळ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘रक्तचंदन’ या संग्रहातील आशयसंपन्न छंदोबद्ध रचना लक्षवेधक ठरतात. ‘मन-मुक्तके’, ‘पावा’, ‘विरूपा’, ‘काजवे’, ‘अगा लाडके, वेदने तू निराळी’ या मला विशेष आवडलेल्या कविता...

‘रक्तचंदन’ ही अर्थवाही प्रतिमा हेच शीर्षक असलेला, बाईपणाचा परोपरीनं वेध घेत असूनही रूढ अर्थानं स्त्रीवादी नसलेला हा कवितासंग्रह आवर्जून वाचावा असा आहे..!
आसावरी काकडे
asavarikakade@gmail.com

३१.१०.२०१७

No comments:

Post a Comment