Saturday 7 October 2023

सावल्यांच्या अंतरंगात डोकावणार्‍या कविता-

‘अनुबंध क्षितिजाचे’, ‘बिन काचेचा बर्फ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता डॉ मिलिंद शेंडे यांचा ‘अंतरंग सावल्यांचे’ हा तिसरा कवितासंग्रह येतो आहे. लिहिलेल्या, संग्रहरूपात प्रकाशित झालेल्या ‘दृश्य’ कविता एका अर्थाने उत्तरार्ध असतात. त्यांचा पूर्वार्ध जमिनीखालच्या मुळांसारखा कवीच्या व्यक्तित्वात पसरलेला असतो. या पूर्वसंचितातूनच उगवलेल्या असतात प्रकाशित झालेल्या कविता..! मिलिंद शेंडे यांनी चार विषयात एम. ए. केल्यावर समाजशास्त्र विषयात पीएच डी पदवी संपादन केलेली आहे. कवी ग्रेस आणि सुरेश भट यांचे मार्गदर्शन त्यांना लाभलेले आहे. आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असण्याचा दीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे....’ त्यांच्या कवितांना इतका समृद्ध ‘पूर्वार्ध’ लाभलेला आहे.

आता प्रकाशित होत असलेल्या कवितासंग्रहाचे ‘अंतरंग सावल्यांचे’ हे शीर्षक मिलिंद शेंडे यांच्या आधीच्या कवितासंग्रहांच्या शीर्षकांसारखेच वेगळे, विचार करायला लावणारे आहे. त्यावरून आतील कवितांचा पोत काय असेल ते लक्षात येण्यासारखे आहे. ‘अंतरंग सावल्यांचे’ या कवितासंग्रहात एकूण शंभर कविता आहेत. त्या सलग वाचताना प्रथम वाचनात मनापर्यंत पोचत नाहीत. तरी त्यावर घाईनं काही शेरा मारता येत नाही. कारण या कवितांमधल्या कितीतरी जागा कविता परत वाचायला हव्यात हे सांगत असतात. ‘अंतरंग सावल्यांचे’ या संग्रहातील कवितेत आलेल्या प्रतिमा आणि लयबद्धता या दोन्हीवर कवी ग्रेस यांचा प्रभाव जाणवतो.

कवितेची लय आशयानुरूप असली की तिचं सौंदर्य व्दिगुणीत होतं. पण हे सहजसाध्य असत नाही. कवितेची लय पकडण्यासाठी ठराविक अक्षरसंख्या, त्यांचा ठराविक अनुक्रम आणि ठराविक मात्रा यांचे नियम पाळावे लागतात. दीर्घ रियाजाखेरीज हे जमण्यासारखे नसते. लयीची उपजत जाण असेल तर कवितेत सहजता येते. अन्यथा बरीच कसरत करावी लागते. ती करताना कधी आशय निसटतो तर कधी लय चुकते. मिलिंद शेंडे यांनी या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

कवितेतील प्रतिमांमुळे कवितेची शैली तयार होते. ही शैली म्हणजेच कविता अशा अर्थाची कवितेची एक व्याख्या आहे- Poetry is not the thing said, but the way of saying it.’ कवितेची प्रत, पोत या प्रतिमांमुळे ठरतो. मिलिंद शेंडे यांच्या कवितांमधे नदीचा काठ, भय व्याकुळता, सावली, अंधार, कारुण्य, आरसे, अंगण, घोडा... अशा प्रतिमा सहज येतात. त्यांचे बोट धरून कवितांमधे शिरता येते. काही उदाहरणं सलग पाहिली की या कवितांची जातकुळी लक्षात येईल.

‘झुल्यावरी थोड्यातरी आठवणी बांधू

देता देता एक झोका पारंबीला सांगू’ (‘आठवण’)

सांग पावलांना कसा लागे दिवसाचा शोध

तसा पणतीच्या उजेडाला अंधाराचा बोध’ (‘भय’)

‘किती सलावा किती रुतावा किती खुपावा काटा

कुठून येती फूलपाखरे उडून जाती वाटा (‘वाटा’)

‘सांगू कसे दुःख तुला सवतीच्या पोरा

भिल्लिणीचे भाग्य लाभो रामाच्याही बोरा’ (भाग्य)

‘माझा कापराचा देह

तुला जळायची भीती (भयभार)



‘सोडूनिया गेली दूर काठावरी नाव

ओळखीच्या सावलीचे आठवते गाव (ओंजळ)

कशी दाटते सांग ना मनी आंधळीच माया

कोण घालते उखाणा पुन्हा कातडी सोलाया (आधार)

या ओळी असलेल्या कविता मला अमूर्त चित्रासारख्या वाटल्या. अमूर्त चित्रं फक्त अनुभवायची असतात. त्यावर भाष्य करता येत नाही. त्यांचा अर्थ लावता येत नाही. या कविता वाचताना प्रत्येकाला त्याचा त्याचा आशय गवसेल, गवसावा. त्यावर काही भाष्य करून दिग्दर्शन करू नये असे वाटले.

या संग्रहात काही मुक्तछंद कविताही आहेत. त्यातील काही उदाहरणं

नेटाने पुढे पाऊल टाकणारे आपण

आतल्या आत किती जखमी होत असतो (अंधार)

‘कोणती अनामिक भीती प्रत्येकाला ग्रासत आहे

श्वासामधले श्वासही आता एक विषाचा प्याला आहे. (भीती)

‘जखमा’ या कवितेत वाड्याची भव्य ओनरशीप इमारत होते तेव्हा अंतर्बाह्य काय काय परिवर्तन होते याचे वास्तव चित्रण केलेले आहे. ‘प्रवाह’ ही एक छान जमून गेलेली कविता आहे. यात मनातल्या अस्थिरतेचं हृदयस्पर्शी चित्रण आहे. या शिवाय ‘दिवेलागण’, ‘सारीपाट’, ‘माझा धर्म’, ‘क्षितिज’ या कविता विशेष उल्लेखनीय आहेत.

ही उदाहरणं ‘अंतरंग सावल्यांचे’ या कवितासंग्रहातील सर्व कविता वाचायची उत्सुकता वाढवणारी आहेत. या कविता वाचकाला अंतर्मुख करतात. मिलिंद शेंडे यांच्या कवितांना रसिकांची भरभरून दाद मिळावी, त्यांच्या हातून उत्तरोत्तर अधिक सकस कवितालेखन होत राहावे ही हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

 

No comments:

Post a Comment