Saturday 7 October 2023

शांत गहिर्‍या तळाशी...

सानुल्या बीजापासून ते माणसापर्यंत प्रत्येकाला सतत व्यक्त व्हायचं असतं. व्यक्त होण्याच्या तर्‍हा वेगवेगळ्या असतात. पण व्यक्त होण्याची आंतरिक ओढ समान असते. माणूस केवळ लिहिण्या-बोलण्यातूनच नाही तर प्रत्येक कृतीतून सतत व्यक्त होत असतो. तरी असं काही उरतंच आत जे कवितेशिवाय इतर कशातूनही व्यक्त होऊ शकत नाही. केव्हा तरी पडलेलं बी जमिनीत रुजतं. रुजणं पूर्णत्वाला गेलं की बीज मातीचं कवच फोडून बाहेर पडतं. तशीच व्यक्त होण्यासाठीची अस्वस्थता परिपक्व होते तेव्हा खरी कविता लिहिली जाते. या संदर्भात संत तुकारामांच्या अभंगातली एक ओळ आठवते- ‘फाकूं नका रुजू जालिया वांचून’

निरुपमा महाजन यांचा ‘शांत गहिर्‍या तळाशी’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्तानं यातल्या कविता वाचताना जाणवलं की त्यांनी ‘रुजू’ झाल्यावरच या कविता लिहिलेल्या आहेत. ‘रुजू’ होण्यासाठी बीजाप्रमाणे खोलातल्या शांत गहिर्‍या तळाशी वाट पाहात बसावं लागतं याची जाण कवयित्रीला आहे हे कवितासंग्रहाचं शीर्षक आणि आतल्या कवितांवरून लक्षात येतं.

आशय आणि अभिव्यक्ती ही कवितेची दोन अविभाज्य अंगं आहेत. अभिव्यक्तीच्या शैलीनुसार आशयाचा पोत बदलतो आणि आशयाच्या प्रगल्भतेनुसार अभिव्यक्तीचा दर्जा ठरतो. दृश्य कवितेच्या रोमरोमांतून आशय डोकावत असतो. कविता कधी मूर्त चित्रासारखी आशयप्रधान असते तर कधी अमूर्त चित्रासारखी शैलीप्रधान असते. निरुपमा महाजन यांच्या कवितांना शैलीप्रधान हे लेबल लावता येण्यासारखं नसलं तरी त्यांचा कल शैलीप्रधानतेकडेच आहे असं म्हणता येतं.

या संग्रहातील अधिकतर कविता लयबद्ध तर आहेतच पण त्यात वैविध्यही आहे. एकच एक छंद किंवा वृत्त वापरलेलं नाही. शेवटची ‘मीरा : एक आशय अनेक वृत्ते’ ही एकच कविता उदाहरण म्हणून पुरेशी आहे. यात वेगवेगळ्या सात वृत्तांचा वापर केलेला आहे. एकच आशय असा अभिव्यक्तीच्या अंगानं वळवणं सोपं नाही. निरुपमा यांचा हा प्रयोग कौतुकास्पद आहे.

विशेष म्हणजे ही वृत्त-लयबद्धता निर्दोष आहे. लयबद्ध कविता लिहिणं कौशल्याचं काम आहे. अभिप्रेत आशय वृत्त-लयीच्या तंत्रात बसवताना बरेचदा आशय तरी फसतो नाहीतर लय तरी चुकते. लिखित / छापील कवितेत आणखी एक धोका असतो. मनातल्या लयीनुसार अक्षर र्‍हस्व हवे असते पण व्याकरणानुसार ते दीर्घ लिहिले / छापले जाते. तसे झाले तर रसिक वाचकाच्या दृष्टिने लय बिनचूक राहात नाही. निरुपमा यांच्या ‘वारस’ या गझलेत वृत्त-लय, काफिया, रदीफ अशी तंत्रं सांभाळताना कशी कसरत केली जाते त्याचं मार्मिक चित्रण आहे. त्यातला एक शेर असा आहे- ‘धड कळला नाही त्यांना शब्दांचा लगाव ओला / पण ‘लगावली’ का चुकली हा जाब विचारत होते..!’

निसर्ग, मानवी नाती, गावाकडचे वर्णन.. असे या कवितांचे विषय आहेत. इथे निसर्ग कधी वर्णन म्हणून येतो तर कधी प्रतिमा बनून येतो. ‘झाडाची प्रेमकविता’, या कवितेत जमिनीच्या वर उभे दिसणारे झाड आणि खाली खोलवर पसरत राहणारी मुळं यांच्यातील विलक्षण प्रेमाचे नाते चितारले आहे. ‘चक्र’ या कवितेत निसर्गवर्णन प्रतिमा म्हणून येते. जीवन-मृत्यूचं चक्र कसं अविरत फिरत असतं याचं सुंदर वर्णन यात आहे. ‘बहर’ ही कविता वाचताना निसर्गाशी कवयित्रीचं नातं किती उत्कट, आतून उगवलेलं आहे याचा प्रत्यय येतो. ‘हिरव्या हिरव्या हजार फांद्या या हातांतुन उगवुन याव्या / कंचपोपटी पानझालरी बोटांमधुनी उमलत जाव्या’ अशी सुरुवात असलेल्या या कवितेत पुढे, पायांना मुळं फुटावीत.. मन खोडासारखं टणक बनावं.. असं म्हणत शेवटी ‘या देहाने गाणारा हा वृक्ष बनावे बहरुन यावे / वठून गेले तरी नव्याने बी इवलेसे पुन्हा रुजावे..!’ अशी इच्छा व्यक्त केलीय.

या संग्रहातील कविता वाचताना, मेधवंती.. फांदोफांदी.. तृष्णित.. कांचनवाटा.. असे काही नवीन शब्द भेटतात. वृत्त-लयीसाठी असे शब्द कवी निर्माण करत असतो. विशेष म्हणजे निरुपमा यांच्या कवितांमधली ही शब्दयोजना कृत्रिम वाटत नाही.

‘आजी’, ‘कंठा’, ‘आईनंतर’ अशा काही कवितांमधे मानवी नात्यांचे भावपूर्ण चित्रण आहे तर ‘जत्रा’, ‘धनी’, ‘कपिला’ अशा काही कवितांमधे गावाकडलं चित्र उभं केलंय. या प्रत्येक कवितेची लय तिच्या आशयाला साजेशी आहे.

‘ती’, ‘भूमिती’, ‘समुद्र’, ‘आयुष्य’, ‘सूज्ञ’, ‘त्राता’ या कविता विशेष उल्लेखनीय आहेत. देहविक्रय करणार्‍या ‘ती’विषयीच्या ‘ती’ या कवितेत शेवटी म्हटलंय, ‘ती भक्ष्य कोडगे बनते / पचवून वेदना सारी / अन इथे सुखाने जगती / कुलवंत घरांच्या पोरी’. वेगळ्या प्रतिमा असलेल्या ‘भूमिती’ या कवितेत म्हटलंय, ‘मीच माझ्या आकृत्यांचे / जोडले नाहीत बिंदू / जीवनाच्या भूमितीची / क्लिष्टता कोणास सांगू?’

अशा कितीतरी ओळी उद्‍धृत करता येण्यासारख्या आहेत. पण तेवढ्यावर भागण्यासारखं नाही. ‘शांत गहिर्‍या तळाशी’ हा पूर्ण कवितासंग्रहच निवांतपणे समरसून आस्वादायला हवा..!

आसावरी काकडे

 

 

No comments:

Post a Comment