Monday 4 April 2022

‘नवा पेटता काकडा’- ब्लर्ब

कविता एक स्वगत असते. शब्दांच्या माध्यमातून भाव प्रकट तर करते तरी मौन अबाधित ठेवते. ती अल्पाक्षरी असते. पण अमूर्त चित्रासारखी बहुमुखी असते. प्रत्येकाला वेगळे दर्शन घडवते.... आंतरिक ऊर्मीतून स्वांतसुखाय लिहिली जाते तरी सुहृदांना दाखवाविशी वाटते. दाद मिळाली की मन सुखावतं... वेळोवेळी अशी दाद मिळालेल्या प्रशांत पनवेलकर यांच्या कविता चौदा वर्षांच्या संयमित प्रतीक्षेनंतर ‘नवा पेटता काकडा’ या नावाने संग्रहरूपात प्रकाशित होत आहेत. पनवेलकर यांचा हा दुसरा कवितासंग्रह. २००८ साली ‘पूर्वा’ हा त्यांचा पहिला संग्रह प्रकाशित झाला होता. सूर्योदयापूर्वीच आता उजाडेल असा दिलासा देणारा मंदिरातला काकडा ही प्रतिमा म्हणजे कवितेच्या जन्मापूर्वी कवितेची चाहुल लागणं..! या दृष्टीने संग्रहाच्या मनोगतातील ‘नित्य नवा काकडा नित्य नवा प्रारंभ..!’ हे उद्‍गार सार्थ वाटतात.

पनवेलकर यांनी विविध विषयांवर उत्कटपणे लिहिले आहे. विदर्भातल्या वास्तव्याच्या खुणा त्यांच्या कवितेत जागोजाग दिसतात. कविता प्रामाणिक असण्याचं हे सुचिन्ह आहे असं मला वाटतं.  ‘बुक्का’ या कवितेत शेतकर्‍यांचं दुःख व्यक्त झालंय, ‘भुलाबाई’ या कवितेत मुलीची मनोवस्था चित्रित झालीय तर ‘होळी’ या अप्रतिम कवितेत सण साजरा होत असल्याचं सुंदर वर्णन आहे. ‘बकध्यान’ ‘देवकण’ सारख्या काही कविता मुळातून वाचून अनुभवण्यासारख्या आहेत.

‘मृत्यु-देशाचे प्रवासी / उभ्या एकाच फलाटी’, ‘जिथे बघितली वाट / तिथे काजवे अपुरे’, ‘विरलेल्या लकेरीची / भग्न झाली स्वरशाळा..’ अशी काव्यात्म अभिव्यक्ती असलेल्या या कविता संग्रहरूपातही रसिकांची दाद मिळवतील.

आसावरी काकडे

२५.२.२०२२

No comments:

Post a Comment