Monday 4 April 2022

मनोगत

 

दामोदर अच्युत कारे गोमंतदेवी पुरस्कार स्विकारताना व्यक्त केलेले मनोगत-

आसावरी काकडे

नमस्कार,

मी मनानं आजच्या शानदार सोहळ्यात उपस्थित आहे असं समजून हे मनोगत लिहीत आहे.....

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पद्मश्री विनायक विष्णू खेडेकर, गोमंत विद्या निकेतनचे श्री जनार्दन वेर्लेकर, श्री सोमनाथ कोमरपंत सर आणि कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर श्रोतेहो, मी प्रथमतः दामोदर अच्युत कारे गोमंतदेवी या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी गोमंत विद्या निकेतन संस्थेनं माझी निवड केली याबद्दलचा आनंद व्यक्त करते. या आगोदर हा पुरस्कार वसंत आबाजी डहाके, ग्रेस, ना. धो. महानोर, अरुणा ढेरे, गजानन रायकर... अशा श्रेष्ठ कवींना देण्यात आला होता असं मला आलेल्या पत्रात वाचल्यावर पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्दिगुणीत झाला. गोमंत विद्या निकेतन संस्थेचे सर्व पदाधिकारी, माझ्या नावाची निवड करणारे मान्यवर यांचे मी हार्दिक आभार मानते.

या संदर्भात गोमंत विद्या निकेतन संस्थेचं पत्र आल्यावर मनात कितीतरी आठवणी जाग्या झाल्या. गोवा आणि त्यातही मडगावचे आणि माझे ऋणानुबंध फार जुने आहेत. लग्नानंतर १९७३-७४ साली आम्ही प्रथम गोव्यात आलो होतो. तेव्हा मडगावलाच हॉटेलात राहिलो होतो. पण त्यानंतर भानुदास घवी आणि मंजुश्री अरविंद पित्रे यांच्या घरी येणे होत राहिले. गोव्यातील माझा कवितावाचनाचा पहिला कार्यक्रम गोमंत विद्या निकेतन संस्थेत श्री अरविंद पित्रे यांच्या संपर्कातून झाला. नंतर इथल्या अनेक कार्यक्रमात मला निमंत्रित केले गेले. पणजी येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, माधवी देसाई यांच्या प्रेरणेतून होणारे श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेचे महिला संमेलन, शेकोटी संमेलन, इन्स्टिट्यूट मिनेझिस्‍ ब्रागांझा संस्थेचे सर्वभाषी कवीसंमेलन, कोंकणी भाशा मंडळाचे चित्रंगी साहित्य संमेलन... अशा कितीतरी कार्यक्रमांच्या आठवणी मनात अजून ताज्या आहेत. माझा ‘बोल माधवी’ हा अनुवादित कवितासंग्रह गोवा विद्यापिठाच्या एम. ए. च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला होता. त्या निमित्ताने सु. म. तडकोडकर सर यांनी गोवा विद्यपिठात माझे व्याख्यान ठेवले होते. त्यावेळच्या विद्यापिठातील वास्तव्याच्या आठवणी अतिशय रम्य आहेत. हेमा नायक यांनी माझ्या ‘स्त्री असण्याचा अर्थ’ या कवितासंग्रहाचा कोंकणी अनुवाद नुकताच केला होता त्याचं पहिलं वाचन आम्ही राहिलो होतो त्या रूममधे झालं होतं. त्याच वास्तव्यात संगीता अभ्यंकरने गोवा दूरदर्शनवर माझी मुलाखत घेतली होती... 

अशा विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं आम्ही दोघं बरेचदा गोव्यात येत राहिलो. गोवा हे आमच्यासाठी फक्त पर्यटन स्थळ राहिलं नाही. एक सांस्कृतिक केंद्रच झालं. गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि मान्यवरांचा जवळून परिचय होत गेला. कै. माधवी देसाई, कै. रवींद्र घवी यांचा विशेष स्नेह लाभला होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं गोव्यातील नामवंत व्यक्तींचा सहवास लाभला. शेकोटी साहित्य संमेलनाच्या वेळी माननीय रमाकांतजी खलप आणि त्यांचे कुटुंबीय यांचे आगत्य अनुभवता आले. नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो, पुंडलिक नायक, हेमा नायक यांचाही स्नेह मिळाला. तडकोडकर सरांनी त्यांच्या घरी घेतलेले गेटटुगेदर चांगले स्मरणात आहे. गिरिजा मुरगुडी, दया मित्रगोत्री, संगीता अभ्यंकर यांच्या घरीही बरेचदा काव्य-गप्पा मैफली झाल्या. अनुजा जोशी, कविता बोरकर, रेखा मिरजकर... या मैत्रिणींशीही एकमेकींच्या घरी जाण्याइतका स्नेह जुळला. माझ्या मनासमोरच्या सोहळ्यात यातली बरीच मंडळी उपस्थित आहेत..

दामोदर अच्युत कारे या कवी बोरकर यांच्या समकालीन असलेल्या कवीच्या नावानं मला आज गोमंतदेवी पुरस्कार मिळतो आहे. या निमित्तानं कवी दामोदर अच्युत कारे यांच्या स्मृतींना उजाळा मिळतो आहे. त्यांचा नंदादीप हा एकमेव कवितासंग्रह वाचायचा योग आला नाही. पण श्री सोमनाथ कोमरपंत सरांनी त्यांच्यावर लिहिलेला सविस्तर लेख वाचायला मिळाला. पोर्तुगीज राजवटीतील विपरीत परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आणि मराठी भाषेत कविता लिहून मराठी कवितेच्या इतिहासात आपले नाव नोंदवले. कवी बोरकर यांच्या समवेत त्यांचे कवितावाचनाचे कार्यक्रम झाले... कोमरपंत सरांच्या लेखातून त्यांचा सविस्तर परिचय झाला. त्यातून आपुलकी निर्माण झाली. पण ‘वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे..’ ही शाळेत असताना पाठ झालेली, मन प्रसन्न करणारी सदाबहार कविता दामोदर अच्युत कारे यांची आहे हे समजल्यावर तर खूप वर्षांनी अचानक अगदी जवळची व्यक्ती भेटावी तसे झाले.

हा पुरस्कार गोमंत विद्या निकेतन या संस्थेच्या ११०व्या वर्धापनदिन सोहळ्यात मिळतो आहे ही विशेष आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. या निमित्ताने या संस्थेचाही ११० वर्षांचा इतिहास समजला. वेळोवेळी आवश्यकतेनुसार आपलं अंतर्बाह्य स्वरूप बदलत संस्था इतक्या दीर्घ काळ कार्यरत राहिली. साहित्य क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवत विधायक कार्य करते आहे ही गोष्ट कौतुकास्पद आहे. या संस्थेच्या भव्य इमारतीत आजचा सोहळा होतो आहे तो मी कल्पनेनं पाहते आहे..

माननीय पद्मश्री विनायक विष्णू खेडेकर यांच्यासारख्या गोमंतकाच्या लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक, पत्रकार आणि लेखक असलेल्या महनीय व्यक्तीच्या हस्ते आज हा पुरस्कार स्विकारण्याची चांगली संधी मला मिळाली होती. पण कार्यक्रमाला प्रत्यक्ष येता आलं नाही त्यामुळे मी या आनंदाला मुकले आहे त्याची रुखरुख मनात राहील.

कवीवर्य दामोदर अच्युत कारे ‘गोमंतदेवी’ पुरस्कारासाठी माझी निवड केल्याचे पत्र गोमन्त विद्या निकेतन संस्थेकडून आल्यापासून मनात बरेच विचार येत आहेत. कविता आणि कवितेसंदर्भातलं सध्याचं पर्यावरण लक्षात येतंय तसंच माझा कवितेसोबतचा प्रवास आठवतो आहे. कविता लिहिता लिहिता कवितेचं स्वरूप कसं उमगत गेलं, कवितेभोवतीचं अवकाश कसं उलगडत गेलं ते सर्व आठवतं आहे. आज हा पुरस्कार स्विकारताना या सर्व आठवणींनी मन भरून गेलं आहे. मात्र या निमित्तानं मनोगत व्यक्त करताना माझ्या या वैयक्तिक कविताप्रवासाबद्दल न बोलता कवितेसंदर्भातलं एक मुक्त चिंतन मी आपल्या समोर ठेवते आहे. यात कवितेच्या रियाजाविषयीचे काही मुद्दे असतील. कवितेचा रियाज म्हणजे काय? तो कसा करायचा?

अनुभवाचं आंतरिकीकरण –

कविता अल्पाक्षरी असते. ती मौनाच्या, प्रतिमांच्या भाषेत बोलते. अनेकार्थांच्या शक्यता तिच्यात सामावलेल्या असतात... कवितेच्या अशा अनेक  वैशिष्ट्यांमुळे लिहिता येणार्‍या प्रत्येकाला कवितेचं आकर्षण वाटत असतं. कविता लिहाविशी वाटण्याचा क्षण हा काहीतरी सांगण्यासाठी आसुसलेला असतो. जे सांगायचं आहे ते मनात पुरेसं रुजलेलं असणं, स्वतःला उमगलेलं असणं ही आतली पूर्वतयारी असते. पुरेसं पिकल्याशवाय फांदी फळाचं बोट सोडत नाही त्याप्रमाणे व्यक्त होण्याच्या अपरिहार्य क्षणाची वाट पाहावी. घाई करू नये. व्यक्त होण्याआधी अनुभवाच्या सर्व बाजू, गुंतागुंत असह्य होण्याइतक्या जाणवायला हव्यात. कधी कधी त्या लिहिता लिहिता जाणवायला लागतात. परिपूर्ण दृश्य कविता आधी मनात तयार असत नाही.

कवितेत ‘Spontaneous overflow’ असतो, असावा. पण हा ओव्हरफ्लो अचानक नसतो. आपल्या नकळत आत बरंच काही घडलेलं असतं... थोडक्यात, व्यक्त व्हायची घाई करू नये. संत तुकारामांनी म्हटलं आहे- ‘फांकूं नका रुजू जालिया वाचून..’

कवितेतील शब्द-योजना -

कविता लिहिताना उत्स्फूर्तपणे शब्द येतात. आशय स्वतःच आपला आकृतिबंध ठरवतो. कवितेची लय, यमक, कविता वृत्तात असेल तर मात्रा.. अशा गोष्टी शब्दयोजनेला वाट दाखवतात. मुक्तछंदात आशयाचा आवेग शब्द घेऊन येतो...

मात्र उत्स्फूर्ततेत पक्व उत्कटता नसेल तर या शब्दयोजनेवर पूर्वसंस्कारांचा प्रभाव पडू शकतो. उत्साहाच्या भरात घाईने हाताशी असलेले शब्द वापरले जातात. शब्द सुचलेले नसतात. आठवलेले असतात. ठराविक यमकं जुळतात. मात्रा जुळवण्यासाठी तर काही वेळा अभिप्रेत नसलेला आशय घेऊन शब्द अवतरतात. थोडक्यात त्यात स्वतःचं असं वेगळं काही जाणवत नाही. समीक्षकी भाषेत ही सांकेतिक शब्दयोजना ठरते.

म्हणून कविता लिहून झाली की हातावेगळी करण्यापूर्वी एकदा थोड्या अंतरावरून आपण ती तपासावी. समीक्षेच्या भाषेत, परिष्करण करावे. स्वतःला जे म्हणायचं आहे, जाणवलं आहे तेच तसंच आपण योजलेले हे शब्द व्यक्त करतायत ना हे पाहावे. आनंद व्यथा वेदना सल राग संताप.. या भावना खूप सार्वत्रिक आहेत. समोरासमोर ठेवलेल्या आरशांच्या मधे ठेवलेल्या वस्तूच्या जशा असंख्य प्रतिमा दिसतात तसे असते या भावनांचे. असंख्य छटा असतात त्यांना. आणि या भावना व्यक्त कारायची भाषाही सार्वत्रिक असते. त्यामुळं आपली भावना व्यक्त करताना या सार्वत्रिकपणातून बाजूला व्हावं लागतं. त्यासाठी स्वतःची शब्दयोजना करता यायला हवी. आपल्या कवितेला आपली शैली हवी.

त्यासाठी ‘खास आपला’ आशय व्यक्त करणारा शब्द शोधणं म्हणजे एकप्रकारे आपल्याला नेमकं काय जाणवलंय ते समजून घेणं असतं. या प्रक्रियेत आपण आपलं अनावरण करत असतो. ‘स्व’चं उद्‍घाटन असतं ते. नेमका, आपला शब्द सापडेपर्यंत खरे समाधान होत नाही. असा शब्द योजणं म्हणजेच जाणीवनिष्ठा..!

३- अनुभवसमृद्धी

एका पाश्चात्य लेखकाला त्याच्या चाहत्यांनी विचारलं, ‘तुम्ही आत्मचरित्र का लिहीत नाही?’ त्यानी उत्तर दिलं, ‘मग इतके दिवस मी काय लिहितोय?’ भावार्थ हा की लेखक जे काही लिहीत असतो ते एकप्रकारे त्याचं आत्मचरित्रच असतं. त्याच्या प्रत्येक लेखनकृतीतून त्याचा ‘स्व’च व्यक्त होत असतो...

त्यामुळं लेखन जर आशयसमृद्ध व्हायचं असेल तर आधी एक व्यक्ती म्हणून आपण समृद्ध व्हायला हवं. व्यक्तिमत्वविकासाचे अनेक मार्ग सतत सांगितले जातात. ते सर्व महत्त्वाचे आहेत. आपापल्या क्षमतेनुसार ते आपण अनुसरावेत. विविध प्रकारचं वाचन, त्यावर स्वतःचा विचार, एखाद्या आवडीच्या विषयाचा सखोल अभ्यास, ज्येष्ठांशी संवाद... अशा गोष्टी आपला दृष्टिकोन घडवायला मदत करतात. एखाद्या घटनेकडे किंवा व्यक्तीकडे पाहण्याचे किती वेगवेगळे दर्शनबिंदू असू शकतात ते अशा व्यासंगातून लक्षात येते. देवाला प्रदक्षिणा घालताना त्या वाटेवरच्या प्रत्येक कोनातून त्याचे वेगळे दर्शन घडते. तसेच असते जगणे समजून घेणेही. वेगवेगळ्या भूमिकांमधून जगण्याविषयीची समज वाढवणं हा प्रगल्भतेकडे नेणारा मार्ग आहे.

४- कवितेतील प्रतिमा...

चांगल्या कवितेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती आत्मनिष्ठ असली तरी वैयक्तिक असत नाही. त्यात अनुभवाचं सामान्यिकरण झालेलं असतं. ‘मी’ सर्वनाम बनून कवितेत आलेला असतो. एकप्रकारे तो ‘स्व’चा विस्तार असतो. हे सामान्यिकरण करण्याचे कार्य कवितेतल्या प्रतिमा करत असतात. उदा. कवी बी यांच्या चाफा या कवितेतील ‘चाफा’ ही प्रतिमा किंवा बालकवींच्या कवितेतील ‘औदुंबर’ ही प्रतिमा.. या प्रतिमा सर्वपरिचित आहेत. आज मला यात दामोदर अच्युत कारे यांच्या कवितेतील ‘झुळुक’ ही प्रतिमा आठवते आहे.

‘अभिधा’, ‘लक्षणा’, आणि ‘व्यंजना’ या शब्दांच्या तीन सामर्थ्यांपैकी व्यंजना हे सामर्थ्य कवितेला पोषक आहे. कधी कधी नेहमीचे शब्दच सूचकतेनं वापरले जातात तेव्हा ते प्रतिमा बनून जातात. उदा. माहेर हा शब्द. इतक्या विविध आयामांनी तो कवितांमधे आला आहे की माहेर या शब्दाच्या वाच्यार्थापलिकडे तो गेला आहे.

रोजच्या जगण्यातल्या साध्या अनुभवांतून कवीला प्रतिमा सुचतात. कवीचे अनुभव-क्षेत्र जेवढे व्यापक तेवढ्या त्याच्या प्रतिमा व्यामिश्र बनतात. आणि त्या सामान्यांसाठी दुर्बोध ठरतात. उदा. कवी ग्रेस, आरती प्रभू यांच्या कवितेतील प्रतिमा...

५- कवितांचा अनुवाद

कवितांचा अनुवाद करणं हा कवितेसाठीचा खरा रियाज आहे असा माझा अनुभव आहे. गायक जसा स्वरसाधनेसाठी शब्दांचा आधार घेऊन स्वर आळवतो तसेच काहीसे अनुवादाच्या प्रक्रियेत होते. इथे दुसर्‍या कवीच्या दुसर्‍या भाषेतील शब्दांमधून व्यक्त होऊ पाहणारा भावाशय तुमच्या समोर असतो. शब्दांचा एक चक्रव्युह रचलेला असतो त्या कवीनं. त्यातील प्रत्येक शब्द भाल्यासारखा त्याच्या आशयाच्या समोर उभा असतो. अनुवादकाला सर्व क्षमतेनिशी त्या व्युहात शिरून त्या शब्दांना जिंकून घेऊन त्यामागे दडलेल्या आशयापुढे आपला शब्द उभा करायचा असतो...!

या प्रक्रियेत अनुवादकाला कविता या साहित्यप्रकाराचं स्वरूप नीट माहीती असावं लागतं. तसंच दोन्ही भाषांचं सखोल ज्ञान आणि त्या भाषा ज्या संस्कृतीच्या वाहक असतात त्यांचीही पुरेशी माहिती असावी लागते. नसली तर माहीती करून घ्यावी लागते... या निमित्तानं त्या कवीशी संवाद होऊ शकतो. तो खूप ‘घडवणारा’ असू शकतो. भाषेशी, शब्दांशी आतून बाहेरून जवळीक साधली जाते. शब्दांच्या सामर्थ्याचं भान अनुवाद करताना जेवढं येतं तितकं लिहिताना, वाचताना कधीच येत नाही.

अनुवादात शेवटच्या क्षणापर्यंत पुन्हा पुन्हा परिष्करण करावं लागतं. ते करताना एकाच वेळी दोन भाषांतील शब्दांशी निकटचं नातं तयार होतं. नवे शब्द, नव्या प्रतिमा, नवी कथनशैली यांचाही हार्दिक परिचय होतो... ही प्रक्रियाही कवितेविषयक, निर्मिती-प्रक्रियेविषयक समजुतीत भर घालणारी असते...

अनुवादित कविता ही समांतर कवितेची निर्मिती असतेच पण या प्रक्रियेत जी आंतरिक मशागत होते त्यातून नव्या स्वतंत्र निर्मितीच्या शक्यता निर्माण होतात. म्हणूनच कवितांचा अनुवाद करणं हे सृजनाचा पैस वाढवणारं एक सशक्त माध्यम आहे असं मला वाटतं.

६- मुक्तछंद- छंदोबद्ध कविता

पूर्वी कविता म्हणजे छंदोबद्धच असायची. हल्ली मुक्तछंदाचा जमाना आहे असं म्हणतात पण सध्या परत छंदोबद्ध कवितेचा जोरदार पुरस्कार होताना दिसतो आहे. फेसबुक, WhatsApp सारख्या माध्यमांमध्ये, कार्यशाळा, विविध उपक्रम घेऊन वृत्तांविषयी व्यवस्थित माहिती देऊन सभासदांकडून त्यानुसार कविता लिहून घेतल्या जातात...

छंदोबद्ध कवितेला अक्षर-संख्या, त्यांच्या मात्रा, त्यांचा अनुक्रम, यमक... असे बरेच नियम असतात. त्यानुसार अंतःस्फूर्त लेखन करणं सोपं नाही. पण नियमानुसार प्रयत्नपूर्वक कविता लिहिता येते. सरावाने कृत्रिमतेचा टप्पा ओलांडला जाऊ शकतो.. पण धडे गिरवणारे बरेचजण अलिकडेच राहतात. ते जाणकाराना कळून येतं.

मुक्तछंद कवितेला काही नियम असल्याचं माझ्या वाचनात आलेलं नाही. त्यात आशयाची लय असते असं म्हणतात. पण ती छंदोबद्ध कवितेसारखी तपासता येत नाही. त्यामुळे मुक्तछंद कविता लिहिणं सोपं आहे असं अनेकांना वाटतं. पण तसं नाहीए. नियम नसल्यामुळं उलट ते अधिक जबाबदारीचं आहे. बोट सोडून सुटं चालण्यासारखं...

मुक्तछंद कवितेत मनातला आशय तुम्हाला योग्य शब्द निवडायला लावतो. छंदोबद्ध कवितेत नियमांचं बोट धरून तुम्ही शब्दांचे पर्याय शोधता. त्यांच्या दिग्ददर्शनानुसार शब्द निवडता. त्यातून कधी नको असलेला आशय स्वीकारावा लागतो तर कधी मनात नसलेला पण अधिक महत्त्वाचा आशय तुमच्या ओंजळीत अलगद येऊन पडतो..! मुक्तछंदात तुम्ही स्वावलंबी असता. आणि कोणत्याही दिग्दर्शनाशिवाय तुम्हाला तुमचे अनावरण करायचे असते...!

माझ्या मते मुक्तछंद कवितेत भावाशय कुठल्याही तडजोडीशिवाय थेट मांडता येतो. पण म्हणजेच तो स्वतःला खोदून उपसून काढावा लागतो. स्वतःला समजून घ्यावा लागतो. पूर्ण आशय मनात तयार असेल असं नाही. लिहिताना तो उलगडत जातो. लिहिणं म्हणजेच खोदणं असतं एकप्रकारे. मुक्तछंद कविता लिहिताना शब्दांना यमक.. असे काही नियम नसतात. पण शब्दांचा फापटपसारा झाला की कविता पसरट होते आणि पुरेसं व्यक्त होता आलं नाही तर अर्थहानी होते. कविता फसते. कवितेच्या लांबीला काही नियम नाहीत. पण त्यातली एकही ओळ काढली किंवा खालीवर केली तर कवितेचा तोल जाईल अशी तिची बांधणी पक्की असावी लागते. कवितेची सुरुवात, विस्तार आणि शेवट याही बाबतीत नियम नसले तरी शेवट असा असावा की लगेच खाली सही करता यावी. शेवटी पंचलाइन किंवा क्लायमॅक्स असावा. विस्तार करताना त्यातली प्रत्येक ओळ आशय पुढे नेणारी असावी. एकच मुद्दा वेगवेगळ्या प्रकारे सांगण्यातही कवीची झेप व्यक्त होऊ शकते. त्यातून आशयाच्या कक्षा लक्षात आणून दिल्या जातात. उदा. कुसुमाग्रजांची ‘प्रेम कुणावरही करावं...’ ही कविता आठवून पाहा..

कविता लिहिणं एकूणातच सोपं नाही. केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे आकाशातली वीज हातात धरण्यासारखंच आहे ते.. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींच्याही एकुणएक कविता उत्तम असत नाहीत. जमून गेलेल्या कोणत्याही कलाकृती संख्येनं थोड्याच असतात. त्यामुळं मुक्तछंद असो की छंदोबद्ध असो त्यात खरं काव्य उतरलंय का? हे महत्त्वाचं. पूर्वी छंदोबद्ध कवितेत पौराणिक कथा गुंफलेल्या असायच्या. तेव्हा ते माध्यम होतं. कथानक असलेल्या त्या कविता छंदोबद्ध असल्या तरी त्यांना कविता का म्हणायचं असा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. मुक्तछंदाला तर असा प्रश्न विचारलाच जाऊ शकतो.

मग प्रश्न निर्माण होतो की कोणत्या रचनेत काव्य आहे असं म्हणायचं? एखादा जमून गेलेला ललित लेख, किंवा एखाद्या वक्त्याचं भाषण, सुंदर दृश्य, जमलेली मैफल... अशा अनेक ठिकाणी ‘काव्या’ची प्रचिती येते. जमून येणं यात फक्त कलाकृती जमून गेलेली असणं येत नाही तर आस्वाद घेणार्‍याची एकतानताही महत्त्वाची. काव्याचा प्रत्यय येण्याचा क्षण हा आस्वाद-प्रक्रियेत असतो. अर्थात मूळ कलाकृतीत तेवढी ओढ असणं आवश्यक आहे... हे समजून घेणं आणि तशी निर्मिती करणं यासाठी सतत प्रयत्नशील राहायला हवं. प्रश्न पडणं, त्यांच्या उत्तरांसाठी संवाद साधणं, अभ्यास करणं, इतरांच्या चांगल्या कविता वाचणं, आपल्यापुरतं त्याचं रसग्रहण करणं.. यात चांगलं काय आहे? कशामुळे आहे? ते पाहणं... चांगलं असण्याचे काही ठोस नियम नाहीत. आपणच ठरवायचं आपल्याला हे का भावलं? तसं लिहायचा प्रयत्न करायचा... ही रियाजाची दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे. ज्याला तीव्र आंतरिक ध्यास आहे अशा व्यक्ती हे उत्स्फूर्तपणे करत असतात...

७- कवितेतील वेगवेगळे प्रवाह-

कवितेचं क्षेत्र खूप व्यापक आहे. आपल्या समकालिन कवी काय लिहितायत आणि पूर्वसुरींनी काय लिहून ठेवलंय हे पाहिलं तर आवाक्‍ व्हायला होईल..

कवितेचेप्रवाह कसे बदलत गेले त्याचा इतिहास पाहिला तर असं दिसतं की अगदी सुरुवातीला तत्त्वचिंतनपर काव्य लिहिलं गेलं. मग ऐतिहासिक / पौराणिक विषयांवर.. हे अभिजात (classical) काव्य. नंतरचा टप्पा रोमॅंटिसीझमचा. यात वैयक्तिक भावभावना व्यक्त केल्या जाऊ लागल्या. मग वास्तववादी- यात सामाजिक वास्तवाचं चित्रण होऊ लागलं. त्यानंतर अतिवास्तववादी- यात मानसिक पातळीवरील वास्तव, संज्ञाप्रवाह, किंवा जे खरं जाणावतंय पण आजपर्यंतच्या सभ्यतेला धरून व्यक्त झालं नाही ते धीटपणे लिहिलं जाऊ लागलं...

कवी आपापल्या वृत्ती-प्रवृत्तीनुसार लिहीत असतो. आताच्या मराठी कवितेत दोन ठळक प्रवाह दिसतात. एक प्रवाह केशवसूत, मर्ढेकर, करंदीकर, सुर्वे, ढसाळ असा मानवकेंद्री, सामाजिक अभिव्यक्तीची अनिवार्यता सांगणारा आहे. तर दुसरा बालकवी, तांबे, कांत, बोरकर, पाडगावकर, ग्रेस... असा सौंदर्यवादी, भावकवितेशी नातं सांगणारा.

आणखी एक प्रवाह आहे अरूण कोलटकर, दिलीप चित्रे यांच्या ‘हटके’ कवितांचा. सध्याचे काही कवी यांनाच थोर कवी मानतात. ‘अभिधानंतर’ नावाचं एक अनियतकालिक हेमंत दिवटे चालवतात. त्यात या प्रवाहातील कविता प्रसिद्ध होतात.

१९८० साली ‘कविता दशकाची’ नावाचा एक प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. संपादक मंगेश पाडगावकर, विजया राजाध्यक्ष... इ. पाचजण होते. त्यात हेमंत जोगळेकर, रजनी परूळेकर, द. भा. धामणस्कर.. इत्यादी दहा कवी समाविष्ट होते.

‘पुन्हा एकदा कविता’ असा एक प्रातिनिधिक कवितासंग्रह १९८२ साली निघाला. (संपादक चंद्रकांत पाटील आणि ना.धो. महानोर.) त्यात कोलटकर, चित्रे, नेमाडे, डहाके, तुलसी परब... अशा ‘वेगळं’ लिहिणार्‍या पंधरा कवींचा समावेश आहे.

या दोन प्रातिनिधिक कवितासंग्रहात आजच्या कवितेचे दोन गट कसे पडले आहेत ते दिसून येईल. आज काय लिहिलं जातं त्याचा एक धावता आलेख समोर ठेवला आहे. जिज्ञासूंनी ही पुस्तकं मिळवून अधिक जाणून घ्यावं.

अशा अनेक अंगांनी कवितेला भिडता येतं. आपल्याला हरप्रकारे समृद्ध करत कविता जगण्याचं प्रयोजन आपल्या हातात ठेवत असते. कवितेविषयीची ही एकूण समज मला वाचन, विचार, ज्येष्ठांशी झालेला संवाद आणि कविता-लेखनाचा दीर्घ अनुभव यातून मिळालेली आहे. यात योगदान असलेल्या सर्व घटकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करते, गोमन्त विद्या निकेतनचे सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित मान्यवर यांचे आभार मानते आणि थांबते.

आसावरी काकडे

 

 

 

No comments:

Post a Comment