सोलापूरचे ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की यांचा ‘या तहानेला तळ नाही’ हा कवितासंग्रह अलिकडे वाचनात आला. एका बैठकीत वाचण्यासारख्या या कविता नाहीत हे लगेच लक्षात आलं. त्या वाचल्यावर मनात मुरत राहतात. मुरलेला, मनात रेंगाळत राहिलेला आशय संग्रह काढून कविता पुन्हा वाचायला लावतो. अशा संग्रहातली एखादी कविता रसग्रहणासाठी निवडणं सोपं नाही.
कवितेची आस्वादप्रक्रिया निर्मिती-प्रक्रियेइतकीच अंतस्थ असते. कवितेच्या अंतरंगात उतरवणारी असते. मनाच्या त्या तरल अवस्थेत उमगलेला कवितेचा निराकार आशय मनस्वी आनंद देणारा असतो. त्या क्षणीच खरंतर आस्वादप्रक्रिया संपलेली असते. उमगलेला हा आशय नंतर कुणाला सांगायचा किंवा एखाद्या लेखात मांडायचा तर पुन्हा तो आशय परोपरीने शब्दांत उतरवावा लागतो. या सर्व प्रक्रियेत आपलं विचारविश्व सतत आपल्या सोबत असतं..!
‘या तहानेला तळ नाही’ या कवितासंग्रहातली ‘शांतता’ ही मला आवडलेली कविता. खरंतर ती मनात अनुभवावी अशी आहे. पण त्याच कवितेविषयी लिहायचं मी ठरवलं आहे. ती कविता अशी-
शांतता
भरून आलेलं आभाळ
पडलेला वारा
निष्पर्ण वृक्षावरली दुपार
सूर्य क्षितिजाआड होतानाचा काळ
निजलेलं गाव
नदीचं कोरडं पात्र
म्हणजे नसते शांतता.
उजाड उघडा माळ
सुगी झालेलं रान
तारा तुटल्यानंतरचं आकाश
पोरकं पोरकं अंगण
म्हणजेही नसते शांतता
शांतता असते :
शब्द विसर्जित झाल्यानंतरचं
रितं रितं मन;
मनापलीकडचं मोहन. (पृ. ३३)
***
या
कवितेत शांतता म्हणजे काय नाही ते आधी सांगितलेलं आहे. जे अनिर्वचनीय असतं त्याविषयी
बोलायचं तर अशा ‘नेती नेती’ भाषेतच बोलावं लागतं... आपल्या भोवती सतत माणसांचा,
वाहनांचा, कुत्री-मांजरी.. पक्षी... कशाकशाचा आवाज येत असतो. सण उत्सवात तर ढोल,
ताशे, डीजे... यांचा घरं हादरवणारा आवाज येत असतो. शांतता म्हणजे या आवाजाच्या
कोलहलातून सुटका असं आपल्याला ढोबळपणे वाटतं. पण शांतता म्हणजे काय नाही ते
सांगण्यासाठी सुद्धा कवीने या कोलाहलाचा उच्चार केलेला नाही.
कवितेत म्हटलंय,
संपृक्त होऊन निःशब्द झालेलं, ‘भरून आलेलं आभाळ’ किंवा रितेपणानं व्याकूळ होऊन ‘पडलेला वारा’ म्हणजे शांतता नाही. आत्ममग्न असलेल्या ‘निष्पर्ण वृक्षावरली मूक दुपार’ किंवा निरोप घेऊन अंधाराचं पांघरूण घालू लागलेला, ‘सूर्य क्षितिजाआड होतानाचा काळ’ म्हणजे शांतता नाही. आपापल्या स्वप्नात हरवलेलं ‘निजलेलं गाव’ किंवा वाहत्या पाण्याचा खळाळ गमावलेलं ‘नदीचं कोरडं पात्र’ म्हणजे शांतता नाही.
शांततेच्या शक्यतांचा मागोवा घेत कवीमन ‘उजाड उघडा माळ’ पालथं घालतं पण त्याला तिथंही शांततेची खूण गवसत नाही. आत साठलेलं सर्व देऊन तृप्ती अनुभवत असलेलं ‘सुगी झालेलं रान’ किंवा तुटलेपणाच्या विरहानं खोलवर दुखावलेलं ‘तारा तुटल्यानंतरचं आकाश’, मुलाबाळांच्या बागडण्याविना ‘पोरकं पोरकं झालेलं अंगण’ कुठेच शांततेचा मागमूस लागत नाही कवीला. शांततेच्या शोधात बाहेर वणवण करून परतलेल्या, अंतरंगात डोकावलेल्या जाणिवेला मग ‘शब्द विसर्जित झाल्यानंतरचं रितं रितं मन’ शांततेला जोजवतं आहे असं दिसतं.. आणि खुणावतं त्याच्याही पलिकडे असलेलं शांततेचं ‘मोहन’ रूप..!
एखाद्या कवीच्या एखाद्या कवितेवर लिहायचं तर त्या कवितेचे शब्द काय सांगतात ते ऐकत आशयाचा असा मागोवा घेत गेल्यावर जी कविता समजते ती बहुधा रसिकाच्या मनात उगवलेली रसिकाची कविता असते. ती तशी असायला काही हरकत नाही. प्रत्येक वाचकाला त्याचा आशय कवितेत सापडावा हे कवितेचं स्वाभाविक सामर्थ्य आहे. Archibald MacLeish या अमेरिकन कवीच्या Ars Poetica या कवितेत म्हटलंय, ‘A poem should not mean but be’- कवितेनं काही सांगू, बोलू नये फक्त स्व-रूपात ‘असावं.’ कवितेविषयक या दृष्टिकोनात हेच अभिप्रेत आहे.
पण कवीच्या मनातली कविता, कवीला काय म्हणायचं आहे ते समजून घ्यायचं तर त्या कवितेतील शब्दांचा अभिधानंतरच्या अर्थाचा मागोवा घेत जावं लागेल. त्यासाठी कवीच्या आशय-संचिताचा परिसर समजून घ्यावा लागेल. तो संग्रहातील इतर कवितांच्या माध्यमातून समजू शकेल.
‘शांतता’ या कवितेतील शब्दांचे बोट धरून ही कविता अनुभवताना लक्षात आलं की ती ‘शांतता’ या शीर्षकाखालच्या पहिल्या ओळीपासून सुरू झालेली नाही आणि शेवटच्या ओळीशी संपलेली नाही. संग्रहातल्या इतर कवितांमधून वेगवेगळ्या नावानं कवीमन याच अनिर्वचनीय ‘असण्या’चा शोध घेतं आहे.
या संग्रहातील ‘एकच शब्द’ या कवितेत
म्हटलंय,
‘अखेरचा
एकच शब्द लिहून ठेवतो
समोरच्या कोर्या कागदावर :
‘तू’
जो एवढी पुस्तकांची रानं
मागं टाकून
नि आयुष्याचा माळ चालून
कधी माझा झाला नाही.’ (पृ.५६)
***
हेमकिरण पत्की यांच्या या कवितेतली ‘जो कधी माझा झाला नाही’... या साध्या शब्दात व्यक्त झालेली उत्कट वेदना प्रत्येक वाचनात मनात खोल उतरत जाते.. कवितेतला हा ‘तू’चा शोध म्हणजे निरामयाचाच शोध असणार असं मला वाटलं. कवितेत म्हटलं आहे, ‘तु’ला समजून घेण्यासाठी मी इतक्या पुस्तकांची रानं तुडवली... पुन्हा पुन्हा पानं उलटली. शब्दांच्या दर्या, डोंगर पार केले... त्यासाठी आयुष्य पणाला लावलं. अख्ख्या आयुष्याचा माळ चालून झाला तरी ‘तू’ आकलनाच्या कक्षेत आला नाहीस. माझा झाला नाहीस.. सापडायचंच नाही म्हणून तू शून्यात लपून बसलास. आणि मी शोधण्याचा अभिनिवेश करत राहिलो. आपण आपापल्या जागी उरलो. होतो तसे..!
कवितेतील ‘तू’ या शब्दाला अनेकार्थांचं वरदान लाभलेलं असतं. वाचक त्याचा जो अर्थ लावेल त्यानुसार पूर्ण कवितेचा आयाम बदलून जातो.. ‘शांतता’ कवितेच्या संदर्भात माझा न झालेला ‘तू’ म्हणजे अनिर्वचनीय शांत अवस्था होऊ शकते.
या कवितासंग्रहाच्या पान ३७ वर ‘मित्रा’ नावाची एक कविता आहे. तिनंही मला परत परत साद घातली... कितीही जवळचा मित्र असला तरी त्याचं संपूर्ण असणं तो सोबत असतानाही पुरेसं समजत नाही. मग शब्दांच्याही पलिकडं अथांग शांततेच्या गावात निघून गेलेल्या मित्राशी संवाद तरी कसा साधणार? या कवितेत शेवटी म्हटलंय,- ‘मित्रा, / निरोपाचा निःशब्द तरी ऐकू द्यायचास / धारणेच्या नव्या वळणावर / पुन्हा भेटण्यासाठी !’
कवीमनाला धारणेच्या प्रत्येक नव्या वळणावर शब्दांच्याही पलिकडच्या थांग न लागणार्या शांततेच्या गावी निघून गेलेल्या मित्राचा निःशब्द ऐकायचाय..!, ‘तू’ला आपलंसं करायचंय. मनापलीकडच्या मोहन रूपातली ‘शांतता’ समजून घ्यायचीय, अनुभवायचीय परोपरीने..! कवीमनाच्या या तहानेला तळ नाहीए..!!
आसावरी
काकडे
१२.०९.२०२५
‘या
तहानेला तळ नाही- कवितासंग्रह
हेमकिरण पत्की
सृजन संवाद प्रकाशन, ठाणे
संपर्क नंबर- ९८२०२७२६४६