Thursday 18 March 2021

बालकवींची कविता

 

‘ग्रंथयात्रा’ या अर्चना मिरजकर याच्या उपक्रमासाठी-

आधुनिक मराठी कवितेची पायाभरणी करणार्‍या मोजक्या कवींमधे बालकवी हे एक महत्त्वाचे कवी मानले जातात. त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण कवितेबद्दल बरंच लिहिलं गेलं आहे. एखादा कवी वर्तमानापासून जितका दूर जातो तितका तो अधिक स्पष्ट कळू लागतो. कारण त्याच्या कवितेकडे अनेक दर्शनबिंदूंमधून पाहणं शक्य होतं. डॉ. अनुराधा पोतदार यांनी बालकवींच्या निवडक कवितांचे ‘बालविहग’ या नावाने संपादन केले आहे. या संपादनाला त्यांनी लिहिलेल्या मर्मग्राही प्रस्तावनेत त्यांनी अनेक समीक्षकांची मतं विचारात घेतली आहेत. नंदा आपटे यांचंही ‘समग्र बालकवी’ हे संपादन प्रसिद्ध झालेलं आहे. बालकवी यांच्या ‘औदुंबर’ या बहुचर्चित कवितेवर तर अनेक समीक्षकांनी लिहिलेलं आहे. या सर्व लेखांचं संपादन ‘बालकवींची ‘औदुंबर’ कविता : विविध अर्थध्वनी’ या नावानं प्रा एस एस नाडकर्णी यांनी केलेलं आहे.

बालकवींच्या कविता वाचल्यावर सहज लक्षात येतं की ‘निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद’ हे त्यांच्या कवितेचं अंतःसूत्र आहे. उन्मुक्त आनंद असो की काळवंडणारे वैफल्य असो, निसर्गात रममाण झालेले बालकवी निसर्ग-प्रतिमांमधूनच आपल्या भावना व्यक्त करतात. त्याच्या प्रेमकविताही वेगळ्या काढता येत नाहीत. वा. ल. कुलकर्णी यांनी तर म्हटलं आहे, ‘बालकवींची निसर्गकविता हीच त्यांची प्रेमकविता होय.’ अनेकार्थी कवितेप्रमाणे अनेक रूपांमधे प्रकटणारा निसर्गही ज्याचा त्याचा वेगळा असतो. बालकवींचा, त्यांनी निर्मिलेला स्वतःचा निसर्ग होता. आणि तो घरात बसून कल्पना केलेला नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेला होता. आत्मसात केलेला आशय कवितेत उतरावा तसा त्यांनी आत्मसात केलेला निसर्ग ‘प्रति-निसर्ग’ बनून त्यांच्या कवितेत उतरला. त्यातील सळसळते चैतन्यौद्गार, निरामय सौंदर्य, चित्रमयता, रंगांची पेरणी, त्याला मिळालेली नादलय, निसर्ग-घटितांना दिलेली मानवी रूपं.... ही बालकवींच्या स्वप्नाळू कवीमनाची ‘प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट’ अशी निर्मिती होती.

बालकवींच्या कविता समजून घेताना त्यांचा अल्पायुषी जीवनपट, त्यांचा काळ, त्यांच्यावर झालेला केशवसुतांसारख्या कवीच्या कवितांचा संस्कार या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कवितेत डोकावणार्‍या बालवृत्तीची चिकित्सा केली जाते. त्यांच्या कवितेत येणारा लडिवाळपणा, कवितांची आशय-कक्षा मर्यादित असणं, अनुभवाला अनुभवत्व येण्यापूर्वीच तो कवितेत उतरणं, अद्‍भुताप्रत गेलेली कल्पनारम्यता कवितेत येणं, काव्यात्म अनुभव पूर्णपणे संवेदनानिष्ठ असणं... ही या बालवृत्तीची चिन्हं आहेत. बलकवींच्या कवितेची ही बलस्थानंही आहेत आणि एका अर्थी मर्यादाही आहेत.

सर्व माणसं सतत भाषेचा वापर करत असतात. त्याच रोजच्या वापरातील भाषेतल्या शब्दांना कवी आपल्या संवेदनेनं वेगळा आयाम देत असतात.  बालकवींच्या कवितेची भाषा तर आतल्या प्रकाशाने उजळलेली, उत्कटतेनं ओथंबलेली होती. त्यामुळे फुलराणी, श्रावणमासी, गर्द सभोती, औदुंबर, तारकांचे गाणे, चिमणीचा घरटा अशा कविता वाचताना त्यांच्या जिवंत प्रतिमासृष्टीचा प्रत्यय आपल्याला घेता येतो, त्यांचं ‘मानसिक वर्तमानकाळात’ वावरणं अनुभवता येतं.

बालकवींच्या सर्वपरिचित अशा निसर्गकवितांखेरीज त्यांनी काही कवितेविषयक कविता, बालकविताही लिहिल्या. त्यांची काही अपूर्ण कथाकाव्येही आहेत. ‘धर्मवीर’ ही सामाजिक आशयाची कविता त्यांनी केशवसुतांच्या ‘तुतारी’ कवितेच्या धर्तीवर लिहिलेली होती. अशा कविता लिहिणं हा बालकवींच्या कवितांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांच्या इतर कवितांच्या तुलनेत ती तितकी सकस उतरली नाही.

‘आनंदी आनंद गडे...’ असं म्हणत निसर्गसान्निध्यात आनंदोत्सव साजरा करणार्‍या बालकवींना वैफल्यानं ग्रासलं तेव्हा मात्र त्यांना त्यातून विचारपूर्वक बाहेर पडता आलं नाही. त्र्य. वि. सरदेशमुख यांनी ‘अंधारयात्रा’ या पुस्तकातील एका लेखात बालकवींविषयी म्हटलं आहे, ‘त्यांच्या भाववृत्तीच्या सुकुमारपणाला जाणिवेच्या कणखरपणाची जोड येथे मिळू शकली नाही. आपल्या मनात दाटत चाललेल्या अंधारावर ज्ञानसंवेदनेची मशालही त्यांना पाजळून धरता आली नाही, किंवा त्या तिमिर प्रवाहात क्रियाशक्तीची नौकाही सोडता आली नाही.’

काही असलं तरी बालकवींनी आपल्या कवितांमधून साजरा केलेला आनंदोत्सव जनमानसात अजून रेंगाळतो आहे. त्यांनी स्वतः हा विश्वास त्यांच्या ‘माझे गाणे’ या कवितेत ‘निरध्वनी हे, मूकगान हे’ यास म्हणो कोणी, / नभात हे सांठवले याने दुमदुमली अवनी’ या शब्दात नोंदवून ठेवलेला आहे.

आसावरी काकडे

 

 

 

No comments:

Post a Comment