Sunday 2 September 2018

खोद आणखी थोडेसे...


आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपण सतत संपत्ती, ज्ञान, कीर्ती, यश... असं काही ना काही मिळवण्याच्या मागे लागलेले असतो. इच्छेच्या तीव्रतेनुसार चालत किंवा धावत तिचा पाठपुरावा करतो. आपली सर्व शक्ती पणाला लावतो. प्रयत्नांती कधी ते मिळून जातं तर कधी हाती लागता लागत नाही. मग एका टप्प्यावर येऊन हताश होऊन आपण थांबतो. हे आपल्या आवाक्यातलं नाही म्हणून निराश होऊन मागं फिरू लागतो... हार मान्य करू लगलेला तो क्षण कसोटीचा असतो. कारण आपली क्षमता संपत आलेली असते. आणि आपली तहान भागवणारं पाणी अगदी थोड्या प्रयत्नांच्या अंतरावर असू शकेल असा विचार करायचं त्राण आपल्यात राहिलेलं नसतं. अशा वेळी प्रयत्नांवरचा विश्वास वाढेल असा धीर कुणी दिला तर किती आधार वाटेल ना? 

‘खोद आणखी थोडेसे’ ही कविता अशा कसोटीच्या क्षणी धीर देणारी, प्रयत्नांना बळ देणारी आहे. कवितेच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे,


                       ‘खोद आणखी थोडेसे 
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी...’

‘तहान’ भागवणारं ‘पाणी’ मिळवण्यासाठी खोदत तुम्ही बरेच खाली, पाणी लागण्याच्या अगदी जवळ गेलायत. आता आणखी थोडेसेच प्रयत्न लागणार आहेत. पण थकून तुम्ही थांबलायत... अशा नेमक्या वेळी ‘खोद आणखी थोडेसे / खाली असतेच पाणी’ हा उमेद वाढवणारा संदेश मिळतो. पुढे म्हटलं आहे, सगळी नाणी खोटी नसतात... म्हणजे या पूर्वी काही प्रसंगात अनुभवल्याप्रमाणे सगळी माणसं वाईट, फसवणारी नसतात. काही मदत करणारीही असतात... तेव्हा निराश होऊन थांबू नका. प्रयत्न चालू ठेवा..

     हे समजावणं एका कवितेच्या, प्रतिमांच्या माध्यमातून आहे. ‘आणखी थोडं खोद..’, ‘खाली पाणी असतं..’, ‘नाणी खोटी नसतात..’ या म्हणण्याचा इथे शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीए. त्यातून सूचित केलेला अर्थ समजून घ्यायचा. कवितेतल्या प्रतिमा म्हणजे ‘लेकी बोले सुने लागे’ अशा असतात. त्यांचा शब्दशः अर्थ एक असतो. पण सूचितार्थ वेगळाच असतो. तो अनेकार्थी होऊन अनेकांना मार्गदर्शक ठरतो. इथे खोदणे ही क्रिया प्रयत्नांची निदर्शक आहे. तर पाणी म्हणजे एक प्रातिनिधिक साध्य आहे. आणि सगळी नाणी खोटी नसतात हा एक सकारात्मक दिलासा आहे.
     कवितेत पुढं म्हटलंय-   

‘घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणार्‍या पानी.’

परोपरीनं समजावणं चाललं आहे. त्यासाठी कवितेत वेगवेगळ्या प्रतिमा आल्या आहेत. आपल्याला काही हवं असतं तसं काही म्हणायचंही असतं. पण आपण बोलत नाही. कधी ते स्वतःलाच उमगलेलं नसतं. तर कधी नेमकेपणानं सांगायचं कसं हे कळत नसतं. कधी ते जाणणारं कोणी समोर नसतं तर कधी सांगायची भीती किंवा संकोच वाटत असतो... कवितेत म्हटलंय प्रत्येकाचं आपलं असं एक गाणं मनात दडलेलं असतं. ते बाहेर पडू द्यावं. ओठ घट्ट मिटून घेऊ नयेत. गाणं मनात कसं असतं ते सांगताना एक उदाहरण दिलंय... वाळलेली, रिक्त झालेली पानं निसर्गनियमानुसार गळत असतात. पण गळताना ती पानगळखुणा मागे ठेवतात. तिथून पुन्हा नवी पानं फुटतात. झाडाचा बुंधा वरून कणखर दिसतो. शांत उभा असतो. पण त्याच्या आत कित्येक जन्मांचे आर्त संचितासारखे साठलेले असते. ते नव्या पानांच्या रूपात उगवून येत राहाते. आर्त म्हणजे दुःख. त्यात अत्यंतिक तीव्रतेनं काही हवं असणं ही अर्थछटाही मिसळलेली आहे... आपल्या आतही असं बरंच काही असतं. ते व्यक्त होण्यासाठी आसुसलेलं असतं. धीटपणानं ओठ उघडून त्याला वाट करून द्यावी. गळून पडलेल्या पानांच्या जागी नवी पानं फुटतात. तसे आपण काही बोलत.. लिहीत गेलो की एका शब्दामागून दुसरे शब्द उमटत राहतात. त्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं. खाली पाणी असतंच.. तसं आत गाणंही असतंच..!
पुढे म्हटलंय-   

‘मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.’

आपल्या मनाची आणखी एक चालाखी असते. प्रयत्न करताना थकून थांबण्याऐवजी, निराश होण्याऐवजी ते आपल्यात काही कमी आहे हेच मान्य करत नाही. ‘झाकली मूठ सव्वालाखाची’ अशी समजूत करून घेतं. आणि आहे तिथं थांबून राहातं. कविता मनाची ही पळवाट शोधून काढते आणि प्रश्न विचारते की मूठ न उघडताच ती भरलेली आहे असं का म्हणायचं? मूठ उघडून स्वच्छ पाहावं. तिचं रितेपण स्वीकारावं... याचा सूचितार्थ असा की स्वतःचा शोध घ्यावा, स्वतःतल्या उणीवा समजून घ्याव्यात. त्यांचा स्वीकार करावा. आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील व्हावं. स्वतःत खोल उतरून पाहावं. तिथं क्षमातांनी भरलेली ‘तळी’ दिसतील. त्या सूप्त रूपात असलेल्या क्षमताना जाग आणावी. आपली रिती ओंजळ भरून घ्यावी. रितेपणाची, उणीवांची जाणीव झाली तरच त्या भरून काढण्याचे प्रयत्न केले जातात.
शेवटच्या कडव्यात म्हटलं आहे-

‘झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे !’

झरा लागेलच... आणखी थोडंसंच खोदायला हवंय... जे मिळवायचंय ते यश पूर्ण क्षमतांनिशी केलेल्या प्रयत्नांमुळेच मिळतं. या प्रयत्नांसाठी लागणार्‍या क्षमता आपल्या आत असतात. त्या सूप्त क्षमता रित्या ओंजळीत घेऊन त्यांचा वापर करावा... हे सगळं केवळ एखाद्या विशिष्ठ साध्यापुरतं नाही. एकूण जगण्याशीच या सगळ्याचा संबंध जोडत कवितेत शेवटी म्हटलं आहे की उमेदीनं जगण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर हे ‘बळ’ लागत असतं...!

ही कविता अशा प्रकारे समजून घेता येईल... पण एखादी कविता अशी समजावून सांगणं म्हणजे घास भरवण्यासारखं आहे. कवितेचा आस्वाद आपला आपण घेता यायला हवा. मात्र त्यासाठी कविता या साहित्य-प्रकाराची पुरेशी ओळख व्हायला हवी. या निमित्तानं याच कवितेचा आधार घेत तेही पाहूया..

कवितेचं वेगळेपण

कथा, कादंबरी, ललित लेख, नाटक.. हे साहित्यप्रकार आणि कविता यात महत्त्वाचे तीन फरक आहेत. १- कविता अल्पाक्षरी असते, २- ती प्रतिमांच्या भाषेत बोलते आणि ३- तिला तिची अशी एक लय असते.

लयसौंदर्य-

लयीनुसार छंदोबद्ध, मुक्तछंद, वृत्तबद्ध.. असे प्रकार मानता येतात. ‘खोद आणखी थोडेसे’ ही कविता अष्टाक्षरी छंदात आहे. या छंदात प्रत्येक ओळीत आठ अक्षरं असतात. दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक जुळावं लागतं. यमक म्हणजे त्या ओळींच्या शेवटी समान अक्षर यावे. उदा. आपल्या कवितेतलं कोणतंही कडवं पाहा. कडवं म्हणजे ठराविक ओळींचा अर्थपूर्ण गट. पहिल्या कडव्यात पाणी – नाणी, दुसर्‍यात मनी – पानी, तिसर्‍यात भरलेली – तळी आणि चौथ्यात जरासे – थोडेसे असे यमक आहे.  ली – ळी किंवा नी – णी असे यमक चालते. कधी कधी इकारान्त, उकारान्त... असे यमक जुळले तरी चालते. याला स्वरयमक म्हणतात. कवितांमधे असे यमक क्वचित येते. अष्टाक्षरी छंदाची स्वतःची अशी एक लय असते. केवळ नियम पाळून ती साधेल असं नाही. कविता लिहितानाच ती लय मनात असावी लागते. या छंदाचे आणखीही बारकावे आहेत. ते सरावाने किंवा अधिक अभ्यासाने लक्षात येतील.

अष्टाक्षरी या छंदाशिवाय षडाक्षरी, ओवी, अभंग.. असे बरेच छंद आहेत. भुजंगप्रयात, मंदाक्रांता, पृथ्वी... अशी अनेकानेक वृत्तही आहेत. वृत्तबद्ध कवितांचे एक वेगळे सौंदर्य असते. पण त्या वृत्तांच्या नियमांना बांधिल असतात. वृत्तबद्ध, छंदोबद्ध कविता संगीत देऊन चालीत म्हणता येतात. शब्दांच्या ‘नाद’ या आयामामुळे कवितेला लयसौंदर्य प्राप्त होते. तर मुक्तछंद कवितेत नियमांचे बंधन नसल्यामुळे आशय मुक्तपणे प्रवाहित होतो. पण या कवितांनाही आशयाची मुक्त लय असते. त्यामुळेच गद्य आणि काव्य यात फरक करता येतो.

अल्पाक्षर रमणीयत्व-

कविता साररूपात व्यक्त होते. ती आशयाचा तपशील सांगत नाही. संदर्भ देत नाही. ‘गागर में सागर’ असे तिचे स्वरूप असते. संदर्भ नसल्यामुळे ती एकाची, एकासाठी राहात नाही. सर्वांना आपल्याचसाठी लिहिलीय असं वाटतं. ‘मला अगदी असंच म्हणायचं होतं’ असं वाचकाला वाटतं ते कवितेचं यश असतं. कविता रसिकांपर्यंत पोचल्याची ती पावती असते. हे अल्पाक्षर रमणीयत्व कवितेचं सौंदर्य वाढवणारं वैशिष्ट्य आहे.

प्रतिमा-वैभव-

कवितांमधल्या प्रतिमा हे कवितेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमांमुळे कविता केवळ कवीमनातल्या आशयाशी बांधलेली राहात नाही. कॅलिडोस्कोप फिरवावा तशी आतली नक्षी बदलत राहाते तसे वाचकाच्या दृष्टीकोनानुसार प्रतिमांचे अर्थ बदलतात. त्यामुळे कविता अनेकार्थी होते. आणि गंमत म्हणजे प्रत्येक अर्थ बरोबर ठरू शकतो. म्हणूनच कवितेला व्दीज- दोनदा जन्मणारी असं म्हटलं जातं. प्रथम ती कवीमनात जन्म घेते. लिहून हातावेगळी झाली की ती कवीची राहात नाही. रसिकांची होते. आस्वाद-प्रक्रियेत तिचा वेगळा अर्थ लावला जातो तेव्हा तो तिचा पुनर्जन्म असतो. हे प्रतिमांमुळे शक्य होते. ‘खोद आणखी थोडेसे’ ही कविता समजून घेताना आपण त्यातल्या प्रतिमांचा अर्थ उलगडून पाहिला. पण त्यातून आणखी वेगळे अर्थही निघू शकतील. चांगल्या कवितेविषयी माझ्या एका कवितेत शेवटी मी म्हटलं आहे-

‘शब्दांचे बोट धरून निघालेल्या प्रत्येकाला
लागू नये एकाच अर्थाचे गाव
कवितेला तर नाहीच
कवितेखालीही नसावे कुणाचे नाव..!’

इथे नाव नसावे म्हणताना तिचा आशय केवळ कवितेच्या किंवा कवीच्या नावाशी बांधलेला नसावा असं म्हणायचं आहे. नावांच्या संदर्भांमधे कविता अडकली की मर्यादित होते. त्या दिशेनंच अर्थ लावला जातो. व्यवहारासाठी ही नावं आली तरी कविता समजून घेताना फक्त हेच संदर्भ धरून ठेवू नयेत.

कवितेतली सर्वनामंही प्रतिमांसारखी असतात. कवितेतला मी, तू, तो, ती म्हणजे कोणी विशिष्ठ व्यक्ती नसतात. आपण त्यांचे अर्थ लावू त्यानुसार कवितेचा परीघ बदलतो. ‘खोद आणखी थोडेसे..’ या कवितेत तर सर्वनामंच नाहीत. ही कविता कवीनं कुणा एकाला उद्देशून लिहिलेली नाही. हे आतून उमगलेलं शहाणपण स्वतःलाच समजावलेलं असू शकतं. किंवा वाचकाला ती आपल्याला उद्देशून लिहिलीय असं वाटू शकतं.

शब्दांची निवड-

कविता-निर्मिती आणि आस्वाद या दोन्ही प्रक्रियांमधे कवितेतल्या शब्दांची निवड हा महत्त्वाचा मुद्दा असतो. कविता लिहिताना शब्दांची निवड होते तेव्हा नेमकं काय म्हणायचं आहे ते निश्चित करावं लागतं. उदाहरणार्थ वाईट वाटलं असं म्हणायचंय. तर नेमकं किती, का, कशामुळे वाईट वाटलं हे नेमकेपणानं सांगणारा शब्द मिळायाला हवा. वाईट वाटण्याच्या अनेक अर्थछटा असू शकतात. त्यातली आपल्याला कोणती अभिप्रेत आहे हे आधी समजून घ्यावं लागतं. मग त्यानुसार शब्द निवडावा लागतो. या प्रक्रियेत भावनेकडून शब्दाकडे प्रवास होत असतो. हा प्रवास म्हणजे एकप्रकारे स्वतःला तपासणं असतं. स्वतःला समजून घेणं असतं. तो स्वतःचा शोध असतो... स्वतःचं अनावरण असतं..!

कवितेचा आस्वाद-

कवितेतली शब्दयोजना समजून घेताना उलट दिशेनं प्रवास होतो. आपण शब्दाकडून भावनेकडे जातो. शब्दाच्या आधारे आपण भावनेचा पोत समजून घ्यायचा प्रयत्न करतो. ही प्रक्रियाही एकप्रकारे स्वतःला समजून घेणारी, स्वतःचं अनावरण करणारी असते. कारण त्या भावनेशी आपण स्वतःला जोडून घेत असतो. चित्रपटातला एखादा करूण प्रसंग पाहताना आपल्याला रडू येतं कारण तो पाहताना आपण त्याच्याशी एकरूप झालेले असतो. कविता समजून घेताना असंच घडतं. घडायला हवं. नुसते शब्द वाचून, त्यांचे अर्थ माहिती होण्यातून कविता समजत नाही. त्या शब्दांमागच्या भावनेशी एकरूप होता आलं तर ती समजते.. भावते..!

माणसासारखी कवितेचीही एक देहबोली असते. उद्‍गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, दोन ओळींच्या मधली रिकामी जागा आणि प्रत्येक ओळीचा थांबा... या प्रत्येक घटकातून कविता काही सांगत असते. शब्दांच्या बरोबरीनं कवितेचे हे सर्व ‘हावभाव’ आणि तिचं मौनही बोलत असतं. कवितेचा आस्वाद घेणं म्हणजे कवीनं रचलेला शब्द.. चिन्ह.. मौन यांचा व्यूह भेदत आत शिरणं..!

विविध अंगांनी थोडक्यात कवितेचं स्वरूप समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा आस्वाद कसा घ्यायचा हेही सूचित केलं आहे. आता या समजुतीच्या प्रकाशात अभ्यासाला नेमलेल्या इतर कविताही समजून घेता येतात का हे तुम्हाला पाहता येईल. मग अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या कवितांचाही आस्वाद घेता येईल. त्यासाठी शुभेच्छा देताना याच कवितेच्या ओळींमधे जरा बदल करून म्हणते-

खोद आणखी थोडेसे
खाली असतो आशय..
कवितेच्या हृदयात
स्थान मिळू दे अक्षय..!

आसावरी काकडे
५.८.२०१८


पाठ्यपुस्तक मंडळाचे मुखपत्र- ‘शिक्षण संक्रमण’ ऑक्टोबर २०१८ 


20 comments:

  1. खुपच छान कवीता👌👌

    ReplyDelete
  2. कविता चांगल्या प्रकारे समजली.😇😇😘

    ReplyDelete
  3. कविता चांघल्या प्रकारे समजली.😇😇😇

    ReplyDelete
  4. कविता चांगल्या प्रकारे समजली.😇😇👍👌

    ReplyDelete
    Replies
    1. हो मला या कविते चे रचना प्रकार पहिजे
      👍

      Delete
  5. कविता उत्तम प्रकारे समजली.

    ReplyDelete
  6. कविता चागली आहे

    ReplyDelete
  7. ashokkoli8719@च्म्फ6faj

    ReplyDelete
  8. Thanks Sir/Madam
    कविता छान आहे.

    ReplyDelete
  9. I am a content writer.
    Email: bhamretejas2007@gmail.com

    ReplyDelete