क्षितिज ही संकल्पना जितकी मोहक तितकीच प्रेरक. पुढे चालत राहायचे निमंत्रण त्यात आहे. क्षितिज गाठणे ही अनेकांची मनीषा असते. हातून मोठे काही घडले की क्षितिज गाठल्याचा आनंद होतो. पण संवेदनशील कवीमनाला त्या पल्याड काय असेल याची जिज्ञासा असते. त्याला क्षितिज गाठणे पुरेसे नसते. क्षितिजापार जायचे असते..!
विजया गुळवणी यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाचे
शीर्षक ‘क्षितिजापार’ असे आहे. या कवयित्रीला क्षितिज गाठण्याची अभिलाषा नाही.
क्षितिजापार काय असेल ही जिज्ञासाही उरलेली नाही. आयुष्याच्या परिपक्व टप्प्यावर
प्रकाशित होत असलेल्या या संग्रहाच्या ‘क्षितिजापार’ या शीर्षक-कवितेत त्यांनी
म्हटलंय,
‘दूरवर अनंताचा
रस्ता स्पष्ट दिसतोय
घट्ट रोवलेला पाय
हलकेच सुटतोय
चल माझ्या सोबतीनं
खुणावतोय ना तोही
चल क्षितिजापार तयारच आहे मीही..!’
कवयित्रीने मनोगतात आपल्या कवितेच्या प्रवासाविषयी सहज साधेपणानं लिहिलेलं आहे. हे मनोगत आणि या संग्रहातल्या कविता वाचताना जाणवतं की या कविता जगण्याशी एकरूप झालेल्या आहेत. घर, संसार, त्यातल्या आपत्ती, जबाबदार्या.. हे सर्व निभावत असताना विजयाताईंना कवितेचा आधार मिळाला. त्यांच्यासाठी कविता म्हणजे मनातलं गूज सांगण्यासाठीचं विश्वासाचं ठिकाण. बहिणाबाईंची कविता त्यांचा आदर्श आहे. त्यांनी कविता लिहायला उशीरा सुरुवात केली असली तरी कवितांची आवड असल्यामुळे त्या सतत कवितेच्या सान्निध्यात राहिल्या. वेगवेगळ्या कवींच्या कविता वाचनातून त्यांच्यावर नकळत कवितेचे संस्कार झाले आणि स्वमग्न उत्कट मनःस्थितीत त्यांच्या कवितालेखनाला सुरुवात झाली.
उत्कट भावना हा कवितेचा प्राण असतो. कवितांचे विषय ठरवणार्या घटना, प्रसंग, नानाविध अनुभव हे तर केवळ त्या त्या संदर्भातल्या भावनांच्या अभिव्यक्तीचे नेपथ्य करत असतात. आयुष्य जितकं अवघड, जितकं दुखावलेलं तितकं मन प्रगल्भ, गहिरं बनत जातं. दुःखांना समजावता समजावता शहाणं होत जातं. स्वतःच्याच दुःखात न बुडता काठावर येऊन इतरांची दुःखं समजून घेऊ लागतं. आयुष्य जगत असताना वाट्याला आलेल्या अनेकविध भल्याबुर्या अनुभवांनी विजयाताईंना लिहीतं केलं. काही उत्कट क्षणांच्या कविता झाल्या. वानप्रस्थाश्रमाच्या टप्प्यावर विजयाताईंचा पहिला संग्रह येतो आहे. यातील कवितांतून डोकावणारं त्यांचं भावसमृद्ध मन स्वतःच्या कोषातून बाहेर पडलं आहे. जीवनाचे सर्व रंग लेऊन इंद्रधनू झालंय... या विविधरंगी कवितांची ओळख होईल अशी काही उदाहरणं-
आईला दिसलेलं बाळाचं
रूप वर्णन करणारी एक बालकविता आहे. हे वर्णन वाचताना ते बाळरूप डोळ्यासमोर
साकारतं. त्यातल्या दोन ओळी-
‘टकमक टकमक बघतंय कोण?
बाळाचे सुंदर डोळे दोन’ (‘बाळ’)
बालविश्वातून बाहेर
डोकावणार्या सजग मनाला दिसणारा भोवताल खिन्न करणारा आहे. अस्वस्थ मनाने आजच्या
समाजाचे चित्र रंगवणार्या एका कवितेत त्यांनी म्हटले आहे-
चोरी करू की देश विकू
त्याशिवाय मी कसा टिकू?
....
गाढ झोप ही कुणाची?
कृष्णाची की जनतेची? (‘सैरभैर’)
अश्वत्थामा ही चिरंजीव
वेदनेची सर्वपरिचित प्रतिमा. ब्रह्मास्त्र सोडलं म्हणून त्याला सतत भळभळत्या
जखमेचा शाप मिळाला. पण काही न करता सतत दुःख वाट्याला आलेल्या प्रत्येकाला
वेगवेगळ्या संदर्भात ही प्रतिमा जवळची वाटते. ‘अश्वत्थाम्या,’ या कवितेत कवयित्री
म्हणते,
‘मी कुठे चुकले ? विचार करून
थकले
भाळच काढून नेले रे..
अन दुर्भाग्य माझे भळभळले’
दुःख माणसाला
जीवनाचं सूक्ष्म आणि खोलवरचं दर्शन घडवतं.. एका कवितेत मानवी दुःखाला कवयित्रीनं
तुकारामांच्या अभंगांची उपमा दिलेली आहे. ही उपमा खूप वेगळी आहे. वाचताना वाटलं, कवीमन
भाषेला स्वतःचा नवीन शब्द बहाल करतं. तशी एखादी नवी प्रतिमाही देऊ करतं... एका
कवितेत कवयित्री म्हणते,
‘हे दुःख आहे ना
ते तुकारामांच्या
अभंगांसारखं आहे
कितीही इंद्रायणीत
नेऊन बुडवलं
तरी वर येतेच आहे..
तरंगतेच आहे
कारण शेवटी ते अभंग आहे..!’
‘दर्शनवारी’, ‘भावतरंग’, ‘मन्वंतर’, ‘शांत निळाई’, ‘परिणिता’ अशा आणखीही बर्याच कविता लक्ष वेधून घेणार्या आहेत. प्रस्तावनेसाठी कविता वाचायला मी विजयाताईंच्या कवितांची डायरी उघडली आणि समोर आलेल्या ‘परिणिता’ कवितेतील ‘सय तुझी सोनचाफा’ या पहिल्याच ओळीने माझे लक्ष वेधले. मग सगळ्या कविता परत परत वाचत गेले.
संग्रह रूपात या कविता वाचकांच्या हाती येतील तेव्हा वाचकांनाही हा संग्रह परत परत वाचावा असंच वाटेल.. ‘क्षितिजापार’ या कवितासंग्रहाच्या निर्मितीमधून विजयाताईंचे कवितेशी असलेले नाते दृढ व्हावे, त्यांना तिची सोबत अखंड लाभावी ही हार्दिक शुभेच्छा..!
आसावरी काकडे
१६.९.२०२४