Thursday 18 March 2021

बालकवींची कविता

 

‘ग्रंथयात्रा’ या अर्चना मिरजकर याच्या उपक्रमासाठी-

आधुनिक मराठी कवितेची पायाभरणी करणार्‍या मोजक्या कवींमधे बालकवी हे एक महत्त्वाचे कवी मानले जातात. त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण कवितेबद्दल बरंच लिहिलं गेलं आहे. एखादा कवी वर्तमानापासून जितका दूर जातो तितका तो अधिक स्पष्ट कळू लागतो. कारण त्याच्या कवितेकडे अनेक दर्शनबिंदूंमधून पाहणं शक्य होतं. डॉ. अनुराधा पोतदार यांनी बालकवींच्या निवडक कवितांचे ‘बालविहग’ या नावाने संपादन केले आहे. या संपादनाला त्यांनी लिहिलेल्या मर्मग्राही प्रस्तावनेत त्यांनी अनेक समीक्षकांची मतं विचारात घेतली आहेत. नंदा आपटे यांचंही ‘समग्र बालकवी’ हे संपादन प्रसिद्ध झालेलं आहे. बालकवी यांच्या ‘औदुंबर’ या बहुचर्चित कवितेवर तर अनेक समीक्षकांनी लिहिलेलं आहे. या सर्व लेखांचं संपादन ‘बालकवींची ‘औदुंबर’ कविता : विविध अर्थध्वनी’ या नावानं प्रा एस एस नाडकर्णी यांनी केलेलं आहे.

बालकवींच्या कविता वाचल्यावर सहज लक्षात येतं की ‘निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद’ हे त्यांच्या कवितेचं अंतःसूत्र आहे. उन्मुक्त आनंद असो की काळवंडणारे वैफल्य असो, निसर्गात रममाण झालेले बालकवी निसर्ग-प्रतिमांमधूनच आपल्या भावना व्यक्त करतात. त्याच्या प्रेमकविताही वेगळ्या काढता येत नाहीत. वा. ल. कुलकर्णी यांनी तर म्हटलं आहे, ‘बालकवींची निसर्गकविता हीच त्यांची प्रेमकविता होय.’ अनेकार्थी कवितेप्रमाणे अनेक रूपांमधे प्रकटणारा निसर्गही ज्याचा त्याचा वेगळा असतो. बालकवींचा, त्यांनी निर्मिलेला स्वतःचा निसर्ग होता. आणि तो घरात बसून कल्पना केलेला नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेला होता. आत्मसात केलेला आशय कवितेत उतरावा तसा त्यांनी आत्मसात केलेला निसर्ग ‘प्रति-निसर्ग’ बनून त्यांच्या कवितेत उतरला. त्यातील सळसळते चैतन्यौद्गार, निरामय सौंदर्य, चित्रमयता, रंगांची पेरणी, त्याला मिळालेली नादलय, निसर्ग-घटितांना दिलेली मानवी रूपं.... ही बालकवींच्या स्वप्नाळू कवीमनाची ‘प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट’ अशी निर्मिती होती.

बालकवींच्या कविता समजून घेताना त्यांचा अल्पायुषी जीवनपट, त्यांचा काळ, त्यांच्यावर झालेला केशवसुतांसारख्या कवीच्या कवितांचा संस्कार या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कवितेत डोकावणार्‍या बालवृत्तीची चिकित्सा केली जाते. त्यांच्या कवितेत येणारा लडिवाळपणा, कवितांची आशय-कक्षा मर्यादित असणं, अनुभवाला अनुभवत्व येण्यापूर्वीच तो कवितेत उतरणं, अद्‍भुताप्रत गेलेली कल्पनारम्यता कवितेत येणं, काव्यात्म अनुभव पूर्णपणे संवेदनानिष्ठ असणं... ही या बालवृत्तीची चिन्हं आहेत. बलकवींच्या कवितेची ही बलस्थानंही आहेत आणि एका अर्थी मर्यादाही आहेत.

सर्व माणसं सतत भाषेचा वापर करत असतात. त्याच रोजच्या वापरातील भाषेतल्या शब्दांना कवी आपल्या संवेदनेनं वेगळा आयाम देत असतात.  बालकवींच्या कवितेची भाषा तर आतल्या प्रकाशाने उजळलेली, उत्कटतेनं ओथंबलेली होती. त्यामुळे फुलराणी, श्रावणमासी, गर्द सभोती, औदुंबर, तारकांचे गाणे, चिमणीचा घरटा अशा कविता वाचताना त्यांच्या जिवंत प्रतिमासृष्टीचा प्रत्यय आपल्याला घेता येतो, त्यांचं ‘मानसिक वर्तमानकाळात’ वावरणं अनुभवता येतं.

बालकवींच्या सर्वपरिचित अशा निसर्गकवितांखेरीज त्यांनी काही कवितेविषयक कविता, बालकविताही लिहिल्या. त्यांची काही अपूर्ण कथाकाव्येही आहेत. ‘धर्मवीर’ ही सामाजिक आशयाची कविता त्यांनी केशवसुतांच्या ‘तुतारी’ कवितेच्या धर्तीवर लिहिलेली होती. अशा कविता लिहिणं हा बालकवींच्या कवितांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांच्या इतर कवितांच्या तुलनेत ती तितकी सकस उतरली नाही.

‘आनंदी आनंद गडे...’ असं म्हणत निसर्गसान्निध्यात आनंदोत्सव साजरा करणार्‍या बालकवींना वैफल्यानं ग्रासलं तेव्हा मात्र त्यांना त्यातून विचारपूर्वक बाहेर पडता आलं नाही. त्र्य. वि. सरदेशमुख यांनी ‘अंधारयात्रा’ या पुस्तकातील एका लेखात बालकवींविषयी म्हटलं आहे, ‘त्यांच्या भाववृत्तीच्या सुकुमारपणाला जाणिवेच्या कणखरपणाची जोड येथे मिळू शकली नाही. आपल्या मनात दाटत चाललेल्या अंधारावर ज्ञानसंवेदनेची मशालही त्यांना पाजळून धरता आली नाही, किंवा त्या तिमिर प्रवाहात क्रियाशक्तीची नौकाही सोडता आली नाही.’

काही असलं तरी बालकवींनी आपल्या कवितांमधून साजरा केलेला आनंदोत्सव जनमानसात अजून रेंगाळतो आहे. त्यांनी स्वतः हा विश्वास त्यांच्या ‘माझे गाणे’ या कवितेत ‘निरध्वनी हे, मूकगान हे’ यास म्हणो कोणी, / नभात हे सांठवले याने दुमदुमली अवनी’ या शब्दात नोंदवून ठेवलेला आहे.

आसावरी काकडे

 

 

 

समर्थ रामदासांची काव्यसृष्टी

एखाद्या दिवाळीअंकात लेख लिहिण्याच्या दृष्टीने ‘समर्थ रामदासांची काव्यसृष्टी’ हा अतिव्याप्त विषय आहे. पण या निमित्ताने समर्थ रामदासांच्या समग्र लेखनाकडे बघण्याचा साहित्यिक दृष्टिकोन लक्षात घेतला जाईल. त्यावर विचार होईल. संत-साहित्य ‘धार्मिक’ या विभागात टाकलं की त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठराविक साच्यातला होतो. श्रद्धेने बहुधा नुसती अक्षरं वाचली जातात आणि ठराविक भाव मनात उतरत राहतो. त्यात स्व-तंत्र आशय-आस्वादनाची प्रक्रिया होतेच असं नाही. संतांच्या रचना कविता म्हणून वाचताना आशयाचे विविध आयाम लक्षात येतात. आशय फक्त रचनेतील शब्दांमधून व्यक्त होत नाही तर त्या रचनेची लय, उच्चारातील नाद, रचनेसाठी योजलेले वृत्त... या सगळ्यातून आशयातील सूक्ष्मता उत्कट होऊन मनाला भिडते.

या दृष्टीने समर्थ रामदासांच्या विविध रचना पाहण्यापूर्वी त्यांच्या व्यक्तित्वातले वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. समर्थ रामदासांचे कार्य सोळाव्या शतकातले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले. ते स्वतः संन्यस्त वृत्तीचे होते. लहानपणीच घर सोडून बाहेर पडलेले. पण त्यांनी जनसामान्यांना प्रवृत्तीधर्म शिकवला. बलोपासनेचे महत्त्व समजावले. त्यासाठी प्रत्यक्ष कार्य केले. हातात धनुष्यबाण धारण करणारा श्रीराम आणि महाबली हनुमान ही त्यांची आराध्य दैवतं होती. ते स्वतःला ‘रामदास’ म्हणवत पण इतरांनी त्यांना ‘संत’ ऐवजी ‘समर्थ’ अशी उपाधी दिली गेली. त्यांचे शिष्य ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा नामगजर करत असतात... सामर्थ्याचे उपासक असलेल्या रामदासांच्या व्यक्तित्वाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात जागोजागी उमटलेले आहे. त्यांनी विविध विषयांवर वेगवेगळ्या आकृतिबंधात लिहिले. त्यासाठी ओवी-अभंगांसारखे छंद, विविध वृत्ते, यमक, अनुप्रास असे अलंकार, अर्थवाही शब्दयोजना, नादतत्त्व, शब्दोच्चार लय यांचा सढळ आणि समर्पक वापर केलेला आहे. रामदासांची ही बहुविध पैलू असणारी काव्यदृष्टी दासबोध, मनाचे श्लोक, शेकडो अभंग, आरत्या, प्रार्थना, स्फुट काव्ये, भारुड, ओवीबद्ध पत्रे... या विविध रचनांमधून व्यक्त झाली आहे. त्यांच्या एकेका रचनेच्या अनुषंगाने त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये, वेगळेपण पाहणे सोयीचे होईल.

दासबोध

दासबोध हा समर्थांनी लिहिलेला प्रमुख ग्रंथ. या पूर्ण ग्रंथाची रचना ओवी-छंदात केलेली असून त्यात रोजच्या जगण्यातील वर्तनासंबधात स्पष्ट मार्गदर्शन आहे. रोजच्या जीवनाला अध्यात्म आणि भक्ती याची जोड कशी हवी हे सांगताना विवेकावर अधिक भर दिलेला आहे. संपूर्ण ग्रंथाची रचना तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण आहे. सृष्टीची निर्मिती, जीव-आत्मा यांचे स्वरूप, ईश्वर कसा आहे?, मूर्तीपूजा, मुक्ती, मानवी जीवनाचा हेतू काय?... अशा सर्व विषयांची मांडणी समर्थांनी प्रत्येकी दहा समास असलेल्या एकूण वीस दशकांमधे सूत्रबद्ध रीतीने केलेली आहे.

समर्थांच्या ओवी-रचनेचा पोत समजण्यासाठी त्यांच्या काही ओव्या पाहू. पहिल्या दशकातील दुसर्‍या समासात गणेशस्तवन आहे. त्याची सुरुवात अशी आहे-


‘ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका । अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥ माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें । मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥’

यातील ‘अज्ञानभ्रांतिछेदका बोधरूपा’ हे संबोधन समर्थांचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. ओव्यांमधली काव्यात्म शब्दकळाही वाचनसुलभ आहे. ‘मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥’ अशी सुरुवात करून इतकी बृहद रचना करून झाल्यावर ग्रंथाच्या शेवटी समर्थ विवेकपूर्ण नम्रतेनं म्हणतात,

‘देहे तंव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा । आणी कवित्वप्रकार मनुशाचा काशावरुनी ॥३४॥ सकळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वचि काय मनुशाचे । ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥३५॥’

मनाचे श्लोक-

एकूण २०५ मनाचे श्लोक समर्थांनी भुजंगप्रयात वृत्तात रचलेले आहेत. या वृत्तात प्रत्येक ओळीत बारा अक्षरे असतात आणि लघु गुरू गुरू, लघु गुरू गुरू या क्रमाने ती यावी लागतात. अशा रचनेमुळे निर्माण होणारी लय किती आशयपूरक आहे ते श्लोक मोठ्यानं म्हणताना जाणवतं. काही श्लोक पाहू-


गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥


**

पहिल्या कडव्यात ‘परा, पश्यंति, मध्यमा, वैखरी’ या चार वाणींचे सूचन आहे. नंतरच्या कडव्यात म्हटलंय, ‘पुढे वैखरी राम आधी वदावा’. म्हणजे ओठांवरील उच्चारात ‘राम’ शब्द उमटण्याआधी तो अंतर्मनात- ‘परा, पश्यंति, मध्यमा’मधे उमटावा...! एकेका ओळीतील असे सूक्ष्म अर्थ जाणून हे श्लोक म्हणायला हवेत.


समर्थांच्या प्रार्थना-

१ करुणाष्टके-

रोजच्या सामान्य जीवनात वाट्याला येणारे व्याप-ताप माणसाला हतबल करतात. कुणीतरी यातून सोडवायला यावं असं वाटतं. अशा मनोवस्थेत ईश्वराशी केलेला आर्त संवाद म्हणजे करुणाष्टके. ही रचना मालिनी वृत्तात केलेली आहे. हे एक अक्षरगण वृत्त आहे. या वृत्तातील कवितेच्या प्रत्येक कडव्यात चार ओळी आणि प्रत्येक ओळीत १५ अक्षरे असतात. यातील अक्षरांचा क्रमही ठरलेला असतो. पहिली सलग सहा अक्षरे लघु, मग तीन अक्षरे गुरू, आणि शेवटची सहा अक्षरे लघू गुरू गुरू, लघू गुरू गुरू अशी असावी लागतात. ओळीतील तीन तीन अक्षरांच्या गटाला गण असं म्हणतात. प्रत्येक ओळीतला यती आठव्या अक्षरावर असतो. अशा रचनेमुळे या वृत्ताला स्वतःची विशिष्ट लय प्राप्त झाली आहे. करुणाष्टकातल्या काही ओळी पाहिल्या तरी या वृत्ताचे सौंदर्य आणि अनुरूपता लक्षात येईल-

‘अनुदिनी अनुतापे तापलो रामराया
परमदिन दयाळा नीरसी मोहमाया
अचपळ मन माझे नावरे आवरीता
तुजविण शिण होतो धाव रे धाव आता ॥१॥’

***

अनेक घरात पूजेच्या वेळी ही प्रार्थना श्रद्धेने म्हटली जाते. सहज कानावर पडली तरी त्यातल्या आळवण्यातली उत्कटता जाणवते आणि नकळत दिलासा मिळतो...

२ कल्याण करी रामराया-

समर्थांची ही प्रार्थना आर्त स्वरात गायली जाते तेव्हा ती ऐकताना मनात गहिवर उमटल्याशिवाय राहात नाही. जनसामान्यांविषयीची आस्था, तळमळ शब्दाशब्दांतून आणि रचनेच्या लयीतूनही व्यक्त झाली आहे. या प्रार्थनेचे शब्द-


कल्याण करी रामराया, देवराया । जनहित विवरी ॥धृ.॥
तळमळ तळमळ होतची आहे । हे जन हाती धरी ॥१॥
अपराधी जन चुकतची गेले । तुझा तूच सावरी ॥२॥
कठीण त्यावरी कठीणची झाले । आता न दिसे हुरी ॥३॥
कोठे जावे काय करावे । आरंभिली बोहरी ॥४॥
दास म्हणे अम्ही केले पावलो । दयेसी नाही सरी ॥५॥

कोमळ वाणी दे रे राम-

     या प्रार्थनेत रामाकडे मागणं केलेलं आहे. ते काय आहे? कोमळ वाणी, विमल करणी, बहुजनमैत्री, विद्या-वैभव, सावधपण, संगीत-गायन, नृत्यकला, सज्जन-संगती, अलिप्तपण, अनन्य सेवा... हे सर्व मागता मागता जाणवतंय की काय मागावं ते कळत नाहीए म्हणून मग जे कळत नाहीए ते दे, आणि शेवटी म्हटलंय, अशी तद्रूपता दे की ‘मजविण मज’ ब्रह्मानुभव मिळावा. किती भावपूर्ण आणि विवेकी मागणी आहे ही..!

अभंग-

१ आरंभी वंदिन अयोध्येचे राजा-

भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग सर्वश्रुत आहे. या रचनेच एक वैशिष्ट्य आहे- ज्या शब्दांनी कडवं संपतं त्याच शब्दांनी दुसरं कडवं सुरू होतं... याला कवितेच्या भाषेत दाम यमक म्हणतात. या रचनेचे शब्द -


आरंभी वंदिन अयोध्येचा राजा
भक्ताचिया काजा पावतसे

पावतसे महासंकटी निर्वाणी
रामनाम वाणी उच्चारिता

उच्चारिता राम होय पापक्षय
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी

पुण्यभूमी पुण्यवन्तासी आठवे
पापिया नाठवे काही केल्या

काही केल्या तुझे मन पालटेना
दास म्हणे जना सावधान

***

२ येथे का रे उभा श्री रामा

पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेलेल्या समर्थांना तिथं आपल्या आराध्य दैवत असलेल्या रामाचंच दर्शन होतं. तेव्हा त्यांना दिसलेल्या रामाला ते विचारतायत, ‘तू येथे का उभा आहेस?’ असे बरेच प्रश्न असलेला हा अभंग बरंच काही सूचित करणारा आहे. त्याचे शब्द असे आहेत-

येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥
काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥
काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥
काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥
धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥
काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥ 

रामी रामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥रामदासांसारख्या निस्सिम रामभक्ताला सर्वत्र रामाचेच दर्शन कसे होते, सर्व देव एकच आहेत, भेद वरवरचा असतो... हा अर्थ तर यातून व्यक्त होतोच. पण ‘धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥’ हा प्रश्न वेगळं काही सूचित करतो आहे असं वाटतं. बाहेर सतत युद्धजन्य परिस्थिती असताना तू धनुष्यबाण टाकून हात कमरेवर ठेवून नुसता उभा का आहेस? असं तर समर्थांना म्हणायचं नसेल?

स्तोत्रे-

रामरक्षेसारखं ‘भीमरूपी महारुद्रा’ हे स्तोत्रंही घराघरात म्हटलं जातं. याला अनुष्टुप छंदाची लय आहे. यातील वनारी, अंजनीसूता, रामदूता, प्रभंजना... अशा एकेका संबोधनातून हनुमंताचं वर्णन केलेलं आहे. चित्रकार रंग-रेषांच्या एकेका आविष्काराने चित्र साकारत नेतो तसे ‘ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें’ अशा वर्णनातून समर्थांनी मनातील आराध्याचं मूर्त रूप साकारलंय. त्यातील काही ओळी-

‘भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||’

‘ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||’
**

समर्थांनी आपल्या रचनांमधे काव्यालंकारांचा सढळ वापर केला आहे. त्यांनी लिहिलेले 'नृसिंहपंचक स्तोत्र' हे लाटानुप्रास अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे. त्यातील एक कडवं- 
 
नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें।
प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें।
खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें।
तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हिजाळें।।
**

आरत्या -

समर्थांनी वेगवेगळ्या देवांच्या साठच्यावर आरत्या लिहिलेल्या आहेत. त्यातील ‘सुखकर्ता दुखहर्ता...’ ही गणपतीची आणि ‘लवथवती विक्राळा..’ ही शंकराची या आरत्या सर्वत्र नेहमी म्हटल्या जातात. या आरत्यांमधील शब्दांमधून झालेल्या रसोत्पत्तीचा काव्यदृष्ट्या विचार केला तर समर्थांची समर्थ काव्यशैली लक्षात येईल. श्री शंकराची आरती म्हणजे तर प्रभावी व्यक्तिचित्रणच आहे. पूर्ण तपशील देत केलेलं यातलं वर्णन डोळे मिटून ऐकलं तर मनःचक्षूसमोर साक्षात शंकर प्रकटेल... ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा’ ही पहिलीच ओळ डोळ्यासमोर एक विराट दृश्य उभं करणारी आहे. त्यातलं पहिलं कडवं-

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा ।।ध्रु.।।
**

समर्थांचे शब्दवैभव त्यांच्या काव्यात जागोजागी दिसते. त्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेली ‘गीरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालिली बळे । धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे..’ असे शिवथरघळीचे वर्णन करणारी सुंदर निसर्गकविता... अशी आणखी कितीतरी उदाहरणं देता येतील. वृत्त, छंद, नादलय, अलंकार, चित्रदर्शी शब्दयोजना... अशा काव्यगुणांमुळे तात्त्विक उपदेश सुंदर आणि भावपूर्ण होऊन जनमनात कसा पाझरू शकतो ते ‘समर्थ रामदासांची काव्यसृष्टी’ या विषयावर लिहिण्याच्या निमित्ताने लक्षात आणून द्यायचा अल्पसा प्रयत्न केला आहे.

आसावरी काकडे

२७.९.२०२०

(या लेखासाठी समर्थांचे समग्र साहित्य प्रत्यक्ष ग्रंथरूपात पाहता आले नाही. बरीच माहिती गूगलसर्चने मिळवलेली आहे. काही चुका असल्यास क्षमस्व.)

 आनंदघन दिवाळीअंक २०२०